You are currently viewing लक्ष्मीकांत सावंत यांच्या निधनाने तरंदळे गावावर शोककळा

लक्ष्मीकांत सावंत यांच्या निधनाने तरंदळे गावावर शोककळा

लक्ष्मीकांत सावंत यांच्या निधनाने तरंदळे गावावर शोककळा; पालकमंत्री नितेश राणे यांनी कुटुंबीयांचे केले सांत्वन

हृदयविकाराच्या धक्क्याने अकाली निधन; मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदतीचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

कणकवली :

तरंदळे येथील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते तथा राणे समर्थक म्हणून परिचित असलेले लक्ष्मीकांत रंजन सावंत (वय ४२, रा. पटेलवाडी, तरंदळे, ता. कणकवली) यांचे २३ जुलै २०२६ रोजी हृदयविकाराच्या अचानक धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मयत लक्ष्मीकांत सावंत यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि अवघा तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
या दुःखद प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नितेशजी राणे यांनी सावंत कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी मुलांच्या शिक्षणासाठी शासनस्तरावर तसेच वैयक्तिक पातळीवर शक्य ती सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच या कठीण प्रसंगी आपण कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी तरंदळेचे सरपंच सुशिल कदम, माजी सरपंच सुधीर सावंत, डॉ. सत्यवान राणे, नरेश घाडी, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
लक्ष्मीकांत सावंत यांच्या अकाली निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा