रश्मीताई लुडबे यांची भाजप प्रदेश महिला उपाध्यक्षपदी निवड; सिंधुदुर्गात आनंदाचे वातावरण
महिला सक्षमीकरण, शेतकरी व गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी केलेल्या कार्याची दखल; बाळासाहेब सावंत यांच्याकडून अभिनंदन
सिंधुदुर्ग
भाजपच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या तथा मालवण तालुक्यातील रश्मीताई लुडबे यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या प्रदेश महिला अध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत ही जबाबदारी दिली आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या रश्मीताई लुडबे यांनी महिला सक्षमीकरण, बचत गटांचे बळकटीकरण तसेच शोषित आणि वंचित महिलांसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्याचबरोबर शेतकरी चळवळीतील विविध मोर्चे, आंदोलने आणि कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गिरणी कामगार घरकुल योजनेअंतर्गत गिरणी कामगारांच्या कुटुंबीयांना मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी त्यांनी पुढाकार घेत हजारो गिरणी कामगारांना संघटित केले. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अनेक कुटुंबांना घर मिळवून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असल्याचे गौरवोद्गार व्यक्त होत आहेत.
या निवडीबद्दल भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी रश्मीताई लुडबे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्रदेश महिला अध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील एका सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यस्तरीय नेतृत्वापर्यंतची त्यांची वाटचाल अनेक महिला कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
