You are currently viewing जिल्ह्यातील टेलीमेडिसिन आरोग्य केंद्रांवर कुपोषण निर्मूलन आठवडा साजरा

जिल्ह्यातील टेलीमेडिसिन आरोग्य केंद्रांवर कुपोषण निर्मूलन आठवडा साजरा

जिल्ह्यातील टेलीमेडिसिन आरोग्य केंद्रांवर कुपोषण निर्मूलन आठवडा साजरा

मालवण

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलीमेडिसिन यंत्रणेद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार सुरू असून याच टेलीमेडिसिन केंद्रा मार्फत सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुपोषण निर्मूलन आठवडा साजरा करण्यात आला. यावेळी टेलीमेडिसिन केंद्रांवर कुपोषण निर्मूलन विषयी जनजागृती करून जिल्ह्यातील ५१२ रुग्णांना माहिती देऊन आवश्यक ठिकाणी गोळ्यांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती जिल्ह्याचे टेलीमेडिसीन प्रकल्पाचे समन्वयक प्रतीक दुसेजा व सुमित सावंत यांनी दिली.

सप्टेंबर महिना हा कुपोषण निर्मूलन महिना म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या सर्व टेलीमेडिसीन सुविधा असलेल्या आरोग्य केंद्रावर कुपोषणाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी गरोदर महिलांचीही तपासणी करून त्यांना मोफत आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली. कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आलेल्या या आठवड्यात सर्व ठिकाणच्या वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून हा कुपोषण निर्मूलन आठवडा यशस्वी केला.

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या दहा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी अत्याधुनिक अशा टेली मेडिसिन प्रकल्पाची सुरुवात करून तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपचार करण्याची नाविन्यपूर्ण सुविधा जिल्ह्यात निर्माण करून दिली. सध्या जिल्ह्यातील मोरगाव, बांदा, रेडी,निरवडे,माणगाव, पणदुर,चौके, गोळवण, मसुरे, आचरा अशा दहा ठिकाणी ही सुविधा कार्यरत आहे. या व्यतिरिक्त आणखीही काही टेलिमेडीसिन सेंटर सुरू करण्यासाठी ना. रवींद्र चव्हाण प्रयत्नशील आहेत, अशी माहिती प्रकल्पाचे उपसमन्वयक सुमित सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 11 =