सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी
कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आदरांजली; पक्षवाढीसाठी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे व पार्थ पवार यांनी सिंधुदुर्ग दौरा करावा, अशी मागणी
सावंतवाडी : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. २२ जुलै २०२६) सावंतवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी ११.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना स्व. अजितदादा पवार यांचा सामान्य कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संपर्क, कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्याची त्यांची कार्यशैली आणि विकासकामांना दिलेले प्राधान्य यांचा उल्लेख केला. त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राने एक तडफदार व कार्यक्षम नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे कार्यकर्ते जाळे असून, पक्ष नेतृत्वाने कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जिल्ह्यात नियमित संपर्क व दौरे करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि खासदार पार्थ पवार यांनी सिंधुदुर्ग दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, असे मतही उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदयराव भोसले, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, अॅड. चेंदवणकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, रामानंद शिरोडकर, शहराध्यक्ष ऑगस्टीन फर्नांडिस, महिला तालुकाध्यक्षा रिद्धी परब, सौ. नाईक, जिल्हा सदस्य गुरुदत्त कामत, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, रणजीत सावंत, प्रकाश गावडे, लक्ष्मण गवस, नंदकिशोर नाईक, नितेश पाटील, राम लाखे, आनंद मेस्त्री, सतीश नाईक, धर्माजी गावडे, डॉ. तुषार भोसले, सचिन पेडणेकर (वेंगुर्ला) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
