आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्लेला रुग्णवाहिका

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्लेला रुग्णवाहिका

दोडामार्ग

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम (सन २०२१-२२) अंतर्गत सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपरिषद आणि कसई दोडामार्ग नगरपंचायत यांना प्रत्येकी २ नग प्रमाणे ६ रुग्णवाहिका खरेदी करण्यास आरोग्य सेवा आयुक्तालयाने आज तांत्रिक मान्यता दिली. त्यामुळे लवकरच आणखी सहा रुग्णवाहिका जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला.

जिल्हयातील १०८ च्या रुग्णवाहिका व इतर रुग्णवाहिका उपलब्ध असताना नविन रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे का याबाबतचा निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घेवून रुग्णवाहिका खरेदी करण्यात यावी. रुग्णवाहिकेच्या कोड प्रमाणे रुग्णवाहिका खरेदी करण्यात यावी.रुग्णवाहिका खरेदी करण्याकरिता सर्वसमावेशक विनिर्देश तयार करण्यात यावे .

तसेच ते तांत्रिक विनिर्देश हे कोणत्याही विशिष्ट कंपनीस फायदा होईल अशा रितीने तयार केलेले नसल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनी खातरजमा करावी. जिल्हा शल्य चिकित्सकांनी रुग्णवाहिका खरेदी करण्यापुर्वी सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपरिषद आणि कसई – दोडामार्ग नगरपंचायत यांचेकडून रुग्णवाहिका रुग्णालयांकरीताच वापरण्यात येईल व त्याचा वापर खासगी संस्थाकरीता होणार नाही अशा आशयाचे हमीपत्र घेण्यात यावे. तसेच ते अनुदान इतर बाब खरेदी करण्याकरीता वळती करण्यात येवू नये व प्रस्तावित खरेदी बाब अनुदानाच्या मर्यादेतच करण्यात यावी रुग्णवाहिकेसाठी आयुक्तालय वाहन चालक व इतर मनुष्यबळ उपलब्ध करुन देणार नाही.  जिल्हयातील रुग्णवाहिकाचा आढावा घेवून , आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका खरेदी करण्यात यावी, रुग्णवाहिका नगरपंचायत/ नगरपरिषदेच्या ठिकाणी उभी राहील .प्रस्तावित खरेदी प्रक्रियेला जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मंजुरी घेणे अनिवार्य राहील. खरेदी पंचसूत्रीच्या अधिन राहून करण्यात यावी.

तसेच जिल्हा नियोजन विकास मंडळाने मंजूर केलेला निधी पूर्णत: खर्च होईल यादृष्टीने त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. वरील प्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा व खर्चाचा अहवाल या आयुक्तालयास सादर करण्यात यावा असेही त्या मंजुरी पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा