नीट, जेईई, टीईटी पेपरफुटीप्रकरणी मनसेचे कुडाळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन
केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत तहसीलदारांना निवेदन
कुडाळ
नीट, जेईई आणि टीईटी परीक्षांमधील कथित पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज कुडाळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नीट, जेईई आणि टीईटी परीक्षांमधील कथित पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला असून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या प्रकरणात जबाबदार असलेल्या व्यक्तींवर अद्याप कठोर कारवाई झालेली नाही. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दर्शविला. आंदोलनकर्त्यांशी केंद्र सरकारने सकारात्मक संवाद साधून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. तसेच पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आली.
या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, मालवण शहराध्यक्ष सागर जाधव, प्रथमेश धुरी, यतिन माजगावकर, संतोष गावडे, दिनार चव्हाण, सुशांत परब, अनिकेत गावडे, सागर मयेकर, अविनाश अणावकर, विजय लाड, परेश गावकर, अनुवास नाईक, सुभाष नाईक आणि शंकर नाईक आदी मनसे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

