You are currently viewing सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे संस्थापक विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ जाहीर

सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे संस्थापक विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ जाहीर

सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे संस्थापक विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ जाहीर

कृषी, सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल; ७ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार गौरव

बांदा

सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे संस्थापक-अध्यक्ष विलास सावंत यांना कृषी, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन, भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क आणि बीबीएल मराठी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
विलास सावंत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारी उत्पादक फळबागायतदार शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. फळबागायतदार शेतकरी संघाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना संघटित करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे.
याशिवाय डिंगणे गावात ग्रामविकास, युवक व महिला मंडळांची स्थापना, महिला बचतगट उभारणी तसेच वीज, पाणी, पोस्ट आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि काजू पिकाला विशेष प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते.
दरम्यान, या पुरस्काराचे वितरण शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा