You are currently viewing नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य! – डाॅ. श्रीपाल सबनीस

नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य! – डाॅ. श्रीपाल सबनीस

नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य! – डाॅ. श्रीपाल सबनीस

*पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर आणि सन्मान सोहळा संपन्न*

पिंपरी

‘कविवर्य नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य होते. त्यांची कविता मानवमुक्तीची कविता आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. पिंपरी – चिंचवड महापालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर अध्यक्षस्थानी होते; तसेच पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त कवी सीताराम नरके
यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उद्योजक आणि कृषिभूषण सुदाम भोरे यांच्या सहधर्मचारिणी वर्षा भोरे (मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान), सामाजिक कार्यकर्ते रोहित खर्गे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), ज्येष्ठ साहित्यिका पल्लवी बनसोडे परुळेकर (पद्मश्री नारायण सुर्वे विचारसाधना पुरस्कार), कवी राजू जाधव (पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

डाॅ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘नारायण सुर्वे हे संस्कृतीच्या शहाणपणाला मौनात पाठविणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या हयातीनंतरही सांस्कृतिक शहाणपण आले आहे की नाही, हा प्रश्न पडतो. जन्मापासून अन्याय सोसूनही त्यांच्या कवितेत कडवटपणा आला नाही; याउलट त्यांनी मातृत्वाचा गौरवच केला आहे!’ सत्काराला उत्तर देताना प्रा. सुरेखा कटारिया यांनी, ‘पारंपरिक संस्कारांच्या कुटुंबात वावरताना सहजीवनाचा अनुभव घेतला. विवाहानंतर स्वत: उच्च शिक्षण घेतले आणि मुलांनाही उच्चशिक्षित केले. जगण्यातला स्वानंद घेत असतानाच त्यात समाजालाही सामावून घेतले!’ अशी भावना व्यक्त केली. वर्षा भोरे यांनी, ‘मोठ्या एकत्र कुटुंबात स्वतःला उन्हात झाड बनून उभे राहावे लागते, अशी शिकवण आईवडिलांनी दिली!’ असे नमूद केले; तर रोहित खर्गे यांनी, ‘आजपर्यंत जीवनात नि:स्वार्थी मित्रांमुळे स्वाभिमानाने जगलो. त्यामुळे हा पुरस्कार मित्रांचाच आहे!’ अशी कृतज्ञता व्यक्त केली. पल्लवी बनसोडे यांनी, ‘प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल घेतली जाते!’ याची ग्वाही दिली; तर राजू जाधव यांनी, ‘कोणत्याही कामाची कधी लाज बाळगली नाही!’ अशी प्रांजळ कबुली दिली. भाऊसाहेब भोईर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘बुद्धीने श्रीमंत होता येते; पण श्रीमंतीने बुद्धिवंत होता येत नाही. नारायण सुर्वे मला प्रेमाने ‘पोट्ट्या’ म्हणत, ही श्रीमंती कशातही मोजता येत नाही!’ असे मत मांडले.

बाजीराव सातपुते यांनी प्रास्ताविकातून कविवर्य सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांतील हे दहावे पुष्प आहे, अशी माहिती दिली. नारायण सुर्वे काव्यजागर कविसंमेलनात राजेंद्र वाघ, जयश्री श्रीखंडे, प्रभाकर वाघोले, स्वाती भोसले, सीमा गांधी यांनी नारायण सुर्वे यांच्या वैविध्यपूर्ण कवितांचे प्रभावी सादरीकरण करून दाद मिळवली. संगीता झिंजुरके यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले; तर पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून हितगुज केले. कार्यक्रमादरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक शिक्षिकेसह प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला; तसेच नियोजित सोळाव्या स्वानंद साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

इंद्रजित पाटोळे, जयवंत भोसले, महेंद्र भारती, प्रा. प्रभाकर दाभाडे, कुमार खोंद्रे, सुप्रिया सोळांकुरे, प्रदीप गांधलीकर आणि स्वानंद महिला संस्थेचे पदाधिकारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा