कौलारू घरातून अंगावर पडलेल्या मांडूळ सापाने चावा; ११ वर्षीय अलिजावर उपचार, विषबाधा नसल्याने सुटकेचा निश्वास
पहाटेची घटना; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिला धीर
सावंतवाडी
तालुक्यातील माजगाव फॉरेस्ट कॉलनी येथे राहणारी कुमारी अलिजा इब्राहिम राजगुरू (वय ११) हिच्या अंगावर कौलारू घराच्या छपरातून मांडूळ (बिनविषारी) साप पडून चावा घेतल्याची घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार व रक्त तपासणी करण्यात आल्यानंतर विषबाधा नसल्याचे स्पष्ट झाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.
घटनेनंतर अलिजाच्या आरडाओरडीनंतर पालक जागे झाले. त्यांनी सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले आणि मुलीला तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर व परिचारिकांनी त्वरित प्राथमिक उपचार करून रक्त तपासणी केली. तपासणी अहवालात विषबाधा नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालकांना मोठा दिलासा मिळाला.
घटनेची माहिती मिळताच जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी रुग्णालयात भेट देऊन अलिजा व तिच्या पालकांना धीर दिला. माजगाव येथील भाईसाहेब सावंत विद्यालयात पाचवी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या अलिजाच्या धाडसाचेही त्यांनी कौतुक केले.
यावेळी मसूरकर यांनी सर्पदंशाबाबत जनजागृती करताना, कोणत्याही सर्पदंशाच्या घटनेत घाबरून न जाता रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. कोणता साप चावला आहे याचा अंदाज स्वतः लावण्याचा प्रयत्न करू नये, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विषारी सर्पदंश झाल्यास वेळेत उपचार मिळणे जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
