जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
एचआयव्हीमुक्त सिंधुदुर्गासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे
–मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर
सिंधुदुर्गनगरी
एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, जनजागृती, तपासणी व उपचार सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झाली. बैठकीस आरोग्य विभाग, महिला व बालविकास, शिक्षण, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.
बैठकीत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. एचआयव्ही तपासणी केंद्रांचे कार्य, एचआयव्ही बाधित व्यक्तींना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या उपचार सेवा, समुपदेशन, जनजागृती अभियान, उच्च जोखीम गटांसाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती सादर करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर यांनी एचआयव्ही संसर्गाबाबत समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था तसेच विविध विभागांच्या माध्यमातून लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितले. तसेच एचआयव्ही बाधित व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता उपचार, समुपदेशन आणि शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळेल, यासाठी संबंधित विभागांनी संवेदनशीलतेने कार्य करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी गर्भवती महिलांची वेळेत एचआयव्ही तपासणी, सुरक्षित रक्तपुरवठा, युवकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती, क्षयरोग व एचआयव्ही संयुक्त तपासणी, तसेच विविध विभागांच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
