You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी व रोबोटिक्स विषयावर मार्गदर्शन

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी व रोबोटिक्स विषयावर मार्गदर्शन

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी व रोबोटिक्स विषयावर मार्गदर्शन

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि रोबोटिक्स या आधुनिक तंत्रज्ञान विषयांवरील मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना AI, IoT आणि रोबोटिक्सची ओळख, विविध सेन्सर्सची मूलभूत माहिती, तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी तसेच दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा उपयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, वाहतूक आणि दैनंदिन जीवनात होत असलेल्या बदलांची माहिती दिली. तसेच भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स क्षेत्रात उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करून त्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी परिचित करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला. विद्यार्थ्यांना श्री. आविष्कार कांबळे, श्री. वैष्णव कुबडे, श्री. प्रथमेश नार्वेकर यांनी मार्गदर्शन केले.
या सेमिनारच्या आयोजनाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सह-संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा