You are currently viewing सासोलीतील वृक्षतोड व अवैध उत्खननाचे आरोप बिनबुडाचे; ओरिजिन कंपनीचा दावा

सासोलीतील वृक्षतोड व अवैध उत्खननाचे आरोप बिनबुडाचे; ओरिजिन कंपनीचा दावा

परवानगीनुसारच सुरू आहे काम; मशीन ऑपरेटरला मारहाण झाल्याचा गंभीर आरोप, कंपनीची बदनामी थांबवण्याचे आवाहन

दोडामार्ग : सासोली येथील काही ग्रामस्थांनी ओरिजिन कंपनीवर केलेले वृक्षतोड व अवैध उत्खननाचे आरोप पूर्णपणे खोटे, बिनबुडाचे व खोडसाळ असल्याचा दावा कंपनीतर्फे कुलअखत्यारपत्रधारक गौरव दत्ताराम बिडये यांनी केला. कंपनीची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच कंपनीच्या मशीन ऑपरेटरला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.

पत्रकारांशी संवाद साधताना बिडये म्हणाले की, सर्व्हे क्रमांक १७० व १७१ मधील सामायिक जमिनीची वहीवाटीनुसार पोटहिस्सा मोजणी होऊन जमिनीचे स्वतंत्र सातबारा उतारे व नकाशे उपलब्ध आहेत. या मोजणीला ग्रामस्थांकडून कोणत्याही न्यायालयात आव्हान देण्यात आलेले नसल्याने संबंधित जमिनीचे सातबारा व नकाशे कायमस्वरूपी स्वतंत्र झाले आहेत. असे असतानाही काही ग्रामस्थ ही सामायिक जमीन असल्याचा दावा करून वारंवार आमच्या स्वतंत्र मिळकतीमध्ये अतिक्रमण (ट्रेसपास) करत असून ते बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व्हे क्रमांकातील जमीन सपाटीकरणासाठी महसूल प्रशासनाची रीतसर परवानगी घेण्यात आली असून त्यानुसारच काम सुरू आहे. कामादरम्यान कोणत्याही प्रकारची वृक्षतोड किंवा अवैध उत्खनन करण्यात आलेले नाही. तसेच मातीची वाहतूकही सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काही ग्रामस्थ जाणीवपूर्वक दुसऱ्या ठिकाणी वादळी पावसामुळे पडलेल्या झाडांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून ते सासोलीतील वृक्षतोडीचे असल्याचा भास जिल्हा प्रशासनाला करून देत कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. संबंधितांनी कंपनीकडे आर्थिक मागणी केली होती. ती पूर्ण न झाल्यानेच कंपनीविरोधात बिनबुडाचे आरोप करण्यात येत असल्याचाही आरोप बिडये यांनी केला.

रविवारी काही ग्रामस्थ कंपनीच्या मालकीच्या जमिनीत घुसून तेथील मशीन ऑपरेटरला मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेमुळे संबंधित ऑपरेटर प्रचंड भयभीत झाला असून सोमवारी तो कामावरही हजर राहू शकला नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी कंपनीची नाहक बदनामी थांबवावी, असे आवाहनही बिडये यांनी केले.

यावेळी ते म्हणाले की, हा सेकंड होम प्रकल्प पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता राबविण्यात येत आहे. प्रकल्प पर्यावरणाच्या सानिध्यात असल्याने वृक्षतोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रकल्पासाठी आवश्यक रस्त्याच्या सपाटीकरणाचे काम सुरू असून कोणत्याही प्रकारे मातीचे उत्खनन करून तिची वाहतूक केली जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा