You are currently viewing स. का. पाटील सिंधुदुर्ग कला, वाणिज्य व देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय व एशियन इन्फोटेक यांच्यात सामंजस्य करार

स. का. पाटील सिंधुदुर्ग कला, वाणिज्य व देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय व एशियन इन्फोटेक यांच्यात सामंजस्य करार

मालवण :

स. का. पाटील सिंधुदुर्ग कला, वाणिज्य व देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय, मालवण आणि एशियन इन्फोटेक, मालवण यांच्यात आज सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. या कराराअंतर्गत माहिती तंत्रज्ञान कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन, कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण, अल्पकालीन अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप अशा विविध उपक्रमांचे संयुक्तपणे आयोजन करण्यात येणार आहे.

एशियन इन्फोटेक हे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चे अधिकृत प्रशिक्षण केंद्र असून, तेथे एमएस-सीआयटीसह टॅली प्राइम, जीएसटी, अॅडव्हान्स एक्सेल आणि इतर रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. टॅली अकॅडमीचे प्रशिक्षणही येथे यशस्वीपणे राबविले जाते. या क्षेत्रातील संस्थेच्या दीर्घ अनुभवाचा आणि तज्ज्ञतेचा लाभ या सामंजस्य करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते आणि एशियन इन्फोटेकच्या वैशाली जुवेकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी श्री. राजाराम जुवेकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. संग्रामसिंह पवार, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. देविदास हारगिले, डॉ. हंबीरराव चौगले आणि डॉ. संकेत बेळेकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना वैशाली जुवेकर यांनी या सामंजस्य कराराअंतर्गत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी “Basics of GST” हा पहिला कौशल्याधारित अल्पकालीन अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच भविष्यात माहिती तंत्रज्ञान, संगणकीय कौशल्य विकास, लेखा व करप्रणाली तसेच रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी विविध अभ्यासक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांच्या संगणकीय कौशल्य विकासाला चालना मिळणार असून माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन प्रकल्प, कौशल्याधारित प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि रोजगारक्षमतेसाठी नवीन संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन केले.

या सामंजस्य करारासाठी महाविद्यालयाच्या वतीने समन्वयक म्हणून डॉ. सुमेधा नाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून आगामी काळात विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, संशोधन उपक्रम आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. या सामंजस्य करारामुळे महाविद्यालय आणि एशियन इन्फोटेक यांच्यातील शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा