कोलगावच्या भोंदू बाबावर कायद्याचा बडगा; ठाणे पोलिसांच्या कारवाईनंतर अघोरी कारनामे पुन्हा चर्चेत
काळ्या जादूच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, ग्रामस्थांच्या तक्रारींनंतर चौकशीची मागणी; १२० हून अधिक नागरिकांनी केली होती अंनिस व पोलिसांकडे लेखी तक्रार
सावंतवाडी :
दैवी शक्ती आणि काळ्या जादूचा खोटा आव आणून सर्वसामान्य लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कोलगाव येथील भोंदू बाबा फिरोज आदम शेख याच्याविरोधात अखेर कायद्याचा बडगा उगारला गेला आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलावर आणि पत्नीवर झालेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर या बाबाचे नाव पुन्हा चर्चेत आले असून, ठाणे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर त्याच्या कथित अघोरी कृत्यांबाबत आणि आर्थिक फसवणुकीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
कोलगाव फणसवाडी येथे सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वी दर्गा उभारण्यात आला. हा दर्गा स्वप्नात येत असल्याचा दावा करून फिरोज शेख याने ग्रामस्थांमध्ये श्रद्धा निर्माण केली. सुरुवातीला ताईत, दोरे आणि उतारे देत त्याने अनेकांचा विश्वास संपादन केला. ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून दर्ग्याचा उरूसही साजरा केला. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत त्याच्या कार्यपद्धतीत मोठा बदल झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्वतःला काळी जादू अवगत असल्याचे भासवत त्याने घरातच अघोरी प्रकार सुरू केल्याचा आरोप आहे. लोकांवर जादूटोणा करणे, बाहुल्यांवर अघोरी विधी करून त्या स्मशानभूमीत पुरणे, काजळ, कुंकू, बांगड्या आणि हाडांचा वापर करून उतारे करणे, तसेच सोमवारी आणि गुरुवारी दोन बकऱ्यांचा बळी देणे, अंगात आल्याचा आव आणून लोकांच्या भावनांशी खेळणे असे प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पूर्वी अल्प उत्पन्न असलेला हा बाबा आता लोकांची फसवणूक करून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दररोज सकाळपासून त्याच्या घरी ग्राहकांच्या रांगा लागत असून गोव्यातूनही अनेकजण आलिशान वाहनांतून येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. एका उताऱ्यासाठी चार ते पाच हजार रुपये, तर श्रीमंत ग्राहकांकडून २० ते २५ हजार रुपये आकारले जात होते. केवळ लिंबू फिरवून उतारा करण्यासाठीही ४०० रुपये घेतले जात असल्याचा आरोप आहे.
या अघोरी प्रकारांचा परिसरातील लहान मुलांवर मानसिक परिणाम होत असल्याने ग्रामस्थांनी त्याला जाब विचारला असता, “माझ्या वाटेला गेलात तर काळ्या जादूने संपवून टाकेन,” अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि गोव्यातील काही राजकीय नेत्यांशी आपले संबंध असल्याचे सांगून तो ग्रामस्थांना घाबरवत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या सर्व प्रकाराला कंटाळून कोलगाव येथील सियास अहमद शेख, नाज शफी अहमद शेख, इरफान इब्राहीम शेख यांच्यासह १२० हून अधिक ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या करून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) सिंधुदुर्ग शाखेकडे लेखी तक्रार केली होती. तसेच वर्षभरापूर्वी सावंतवाडी पोलिसांकडेही ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, २०१३’ अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली होती.
याबाबत सावंतवाडी पोलिसांनी सांगितले की, उरूसपूर्वी परवानगीबाबत अर्ज प्राप्त झाला होता. दोन्ही बाजूंची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्यात आला होता. त्यावेळी संबंधिताच्या घरी चौकशी करण्यात आली होती; मात्र संशयास्पद काही आढळले नव्हते. मशिदीसाठी पायऱ्यांना जागा देण्यावरूनही दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाला होता.
मात्र, ठाणे पोलिसांनी केलेल्या ताज्या कारवाईनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता कोलगाव ग्रामस्थांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे.
