नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
रक्तदान शिबिर, एक हजार वृक्षवाटप, गणवेश वाटप, गुणवंतांचा सत्कार व विकासकामांचे भूमिपूजन; कणकवलीकरांना सहभागी होण्याचे आवाहन
कणकवली :
कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा नगराध्यक्ष झाल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस १४ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रम आणि विकासकामांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिर, एक हजार वृक्षांचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण, चित्रकला स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केले.
कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक लुकेश कांबळे, रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, संतोष पुजारे, दिवाकर मुरकर, निकीत मुरकर आदी उपस्थित होते.
सुशांत नाईक म्हणाले, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गेली दोन दशके सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. त्याच परंपरेनुसार यंदाही वाढदिवस कोणत्याही दिखाव्याऐवजी समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाढदिवसानिमित्त शहरात एक हजार वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सुमारे ५०० रक्तदात्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने माजी उपसरपंच सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच दहावी, बारावी आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. १३ जुलै रोजी एचपीसीएल हॉल येथे गुणवंतांचा सत्कार, चित्रकला स्पर्धा आणि रक्तदान शिबिर होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाखालील परिसराचे सुशोभीकरण, गणपती सान्या परिसराचा विकास आणि अन्य विकासकामांचा शुभारंभ यावेळी होणार आहे.
पत्रकार परिषदेत नगरपंचायतीच्या गेल्या सहा महिन्यांतील कामांचा आढावाही घेण्यात आला. स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक कणकवलीच्या संकल्पातून शहर स्वच्छता, मोकाट जनावरांच्या समस्येवर उपाययोजना तसेच विविध विकासकामे वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली. नमो उद्यानासह अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर यांचा पहिलाच वाढदिवस कणकवलीकरांनी उत्सवासारखा साजरा करावा आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केले.
