*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ओढ*
हरभगिनी ८+८+८+६
दोन ध्रुवांवर दोघे आपण, मध्ये आहे खोल दरी
जवळ यायची ओढ मनाला सदा वाटते किती उरी
तू तिकडेही शांतशांतसा,व्याकुळ मी पण मनांंतरी
भिन्न जरीही स्वभाव अपुले ओढ राहते खरी खरी
तू नियमाने नित जगणारा, मुक्त असा वावर माझा
दोन्ही वाटा जरी वेगळ्या वाटे मज आधार तुझा
दो टोकांना उभे राहुनी पूल मनाचा बांधू या
भेटल्याविना परस्परांना साथ नेहमी देऊ या
ऋण स्वीकारुन नाते जपले , तुटू दिला नाही धागा
परिस्थितीने दूर जाहलो केला नाही पण त्रागा
तुझ्या जगाचे रंग वेगळे, कथा वेगळी मी जपली
वेगळेपणा नित जपणारी एक विराणी ही अपुली
विरुद्ध बाजू विरुद्ध वाटा एक भावना मनातली
दूर असुनिया जवळ भासते ओढ विरोधी ध्रुवातली
©️®️डॉ मानसी पाटील
