*विज्ञानाची गोडी वाढविण्यासाठी मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘ChemAmaze’ कार्यशाळेचे आयोजन*
सावंतवाडी
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी आवड निर्माण व्हावी आणि विज्ञान शिक्षण अधिक रंजक व आनंददायी व्हावे या उद्देशाने पुणे नॉलेज क्लस्टर आणि सिंधुदुर्ग तालुका विज्ञान शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेत सोमवार दिनांक 6 जुलै रोजी ‘ChemAmaze’ या विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन गेम्सच्या माध्यमातून विज्ञानातील विविध संकल्पना समजावून सांगण्यात आल्या. पाण्याच्या अवस्था (States of Water), घनता (Density), विविध pH मूल्ये अशा विषयांवरील शैक्षणिक खेळ विद्यार्थ्यांनी उत्साहाने खेळले. तसेच प्रत्यक्ष (Hands-on) उपक्रमांद्वारे विज्ञानातील संकल्पना अधिक प्रभावीपणे समजून घेण्याची संधी मिळाली.
कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे, विज्ञान शिकण्याची प्रक्रिया आनंददायी करणे आणि गेम-आधारित शैक्षणिक साधने तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे हा होता. विद्यार्थ्यांनीही अशा प्रकारचे शैक्षणिक खेळ विकसित करण्याचे आवाहन यावेळी तज्ज्ञांनी केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विज्ञानाविषयीची जिज्ञासा आणि नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतीमुळे ही कार्यशाळा यशस्वी ठरली. विद्यार्थ्यांना जान्हवी अग्रवाल, चिन्मय स्वामी, शितल नागपुरे, निहारीका गोगटे या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विज्ञान शिक्षक संघटना सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री. पांडुरंग काकतकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर, विज्ञान शिक्षिका श्रीम. फरजाना मुल्ला, श्रीम. साक्षी सावंत आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.
