नगराध्यक्ष चषक स्पर्धेतून क्रीडेला चालना; सावंतवाडी स्पोर्ट्स जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी निधीची ग्वाही
सावंतवाडी :
“पालकमंत्री, आमदार आणि नगराध्यक्ष या खुर्च्या काटेरी असतात. येथे काम करण्यासाठी वेळ दिला जात नाही. खुर्चीवरून खाली खेचण्याचे एकतर्फी कार्यक्रम सुरू असतात. मात्र हटणार नाही, ही भूमिका ठेवा. पदाला न्याय द्या, टीकेकडे दुर्लक्ष करून सावंतवाडीच्या विकासावर लक्ष केंद्रित करा,” असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांना केले. सावंतवाडी नगरपरिषद आयोजित पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज स्मृती जिल्हास्तरीय ‘नगराध्यक्ष चषक’ स्पर्धेनिमित्त दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते.
पालकमंत्री राणे पुढे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मोबाईलमध्ये अधिक रमली आहे. अशा वेळी इनडोअर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. या स्पर्धेमुळे तरुणांना मोबाईलपासून दूर राहून मैदानावर उतरण्याची आणि व्यक्तिमत्त्व विकासाची संधी मिळेल. सावंतवाडी स्पोर्ट्स जिमखाना अधिक सुसज्ज व दर्जेदार करण्यासाठी नगरपरिषदने तातडीने नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, तरुणपणी आम्ही नेहमी मैदानावर असायचो. खेळ माणसाला आयुष्यात अनेक गोष्टी शिकवतो. बुद्धिबळातून विचार करण्याची क्षमता वाढते, तर संघभावनेतून एकजुटीने विजय मिळविण्याचा बोध होतो. समाजात आणि राजकारणातही खेळाडूवृत्ती असणे गरजेचे आहे. जसे खेळाडू आपल्या संघाच्या विजयासाठी प्रयत्न करतात, तसेच सर्वांनी जिल्हा आणि देशाच्या प्रगतीसाठी काम केले तर विकास दूर राहणार नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू असून अशा स्पर्धांमधून त्यांना संधी मिळाल्यास भविष्यात आणखी विश्वनाथ आनंद किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटनपटू देशाचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा खेळाडूंना पुढे जाण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
समाजात आज चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करण्याऐवजी टीका करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे नमूद करत पालकमंत्री राणे म्हणाले, “धीरूभाई अंबानी म्हणायचे, तुम्ही यशस्वी होत आहात हे कशावरून समजायचे? जेव्हा तुमच्यावर सर्वाधिक टीका होते. त्यामुळे टीकेकडे अजिबात लक्ष देऊ नका. वाकड्या आणि आव्हानात्मक रस्त्यावर ड्रायव्हिंग करण्यातच खरी मजा असते. मी आणि राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.” तसेच बॅडमिंटनसह सर्व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सभापती प्रमोद सावंत, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, नगरपरिषद सभापती मोहिनी मडगांवकर, दिपाली भालेकर, नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सुयाजी, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, मधुकर देसाई, नंदू प्रभू देसाई, जोवेल डिसिल्वा, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, संतोष गावस यांच्यासह प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, नगर अभियंता तुषार सरडे तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी सहभागी खेळाडू आणि आयोजकांना पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेला भेट देत स्पर्धकांशी संवाद साधला. कॅरम खेळण्याबरोबरच बॅडमिंटन कोर्टवरही त्यांनी रॅकेट हातात घेत खेळाचा आनंद लुटला. यावेळी नागरिकांनी नियमित खेळाकडे वळून आरोग्य जपावे, असा संदेशही त्यांनी दिला.
