राष्ट्रीय मिनीगोल्फ स्पर्धेत एमआयटी-एडीटीच्या प्रांजली सुरदुसेची सुवर्ण कामगिरी
पुणे :
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंग सायन्सेस अँड रिसर्चमधील विद्यार्थिनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने २५ ते ३० जून २०२६ या कालावधीत छत्तीसगडमधील दावरा विद्यापीठ येथे आयोजित ११ व्या वरिष्ठ राष्ट्रीय मिनीगोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरीसह सुवर्णपदक पटकाविले आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सांघिक गटात सुवर्णपदक पटकावत एकूण अजिंक्यपद (ओव्हरऑल चॅम्पियनशिप – प्रथम क्रमांक) मिळविले. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत मिनीगोल्फ फेडरेशन ऑफ इंडियातर्फे प्रांजली सुरदुसे हिला ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मिनीगोल्फ खेळाडू’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रांजलीचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र संघाने सर्वांत कमी ३२२ गुण घेत सर्वोत्तच कामगिरीची नोंद करत स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. महाराष्ट्रा पाठोपाठ छत्तीसगड ३४५ गुण व पश्चिम बंगाल संघाने ३४८ गुण घेत रौप्य व कांस्य पदक पटकाविले. प्रांजली ही एमआयटी एडीटी विद्यापीठाची अत्यंत हुरहुन्नरी खेळाडू असून तिने यापूर्वी नागपूर येथे झालेल्या वरिष्ठ राज्य मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पदक देखील पटकाविले होते. तसेच यापूर्वीही तिने राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळविलेले आहे.
या कामगिरीनंतर एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनिता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे तसेच छत्रपती शिवाजी पुरस्कारप्राप्त क्रीडा विभाग संचालक प्रा. पद्माकर फड यांनी प्रांजलीचे अभिनंदन करत तिला भावी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
