प्रयोगशील शेतीची राज्याने घेतली दखल; महेश संसारे यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’
आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, दुग्धव्यवसाय आणि शेतकरी मार्गदर्शनाची राज्यस्तरावर दखल
वैभववाडी :
तालुक्यातील मांगवली येथील प्रगतिशील शेतकरी महेश रामदास संसारे यांना सन २०२३ चा राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ (सर्वसाधारण गट) जाहीर झाला आहे. आधुनिक शेतीपद्धती, सेंद्रिय शेती, पूरक व्यवसाय आणि शेतकरी मार्गदर्शनातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
महेश संसारे यांनी आपल्या एक हेक्टर क्षेत्रावर काजू व पेरू बागेची लागवड केली असून, काजू बागेत एक हजार शेवग्याची रोपे लावून ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा किफायतशीर वापर केला आहे. मुख्य पिकांसोबत मिरची, हळद तसेच पेरू बागेत कलिंगडाचे आंतरपीक घेऊन त्यांनी शेती अधिक लाभदायक केली आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी गिर देशी गोवंश संगोपनाचा व्यवसाय विकसित केला असून, जनावरांसाठी चारा पिकांचीही लागवड केली आहे. तसेच ‘गोपाळकृष्ण शेतकरी गट’ स्थापन करून गट यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आधुनिक शेतीला चालना दिली आहे.
पंचगव्य थेरपीचे प्रशिक्षण घेऊन गांडूळखताद्वारे जमिनीची सुपीकता वाढविण्याचे नियोजन त्यांनी यशस्वीपणे राबविले आहे. राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांना माननीय राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. तसेच कृषीथॉन, नाशिककडून ‘आदर्श दुग्ध उत्पादक’ आणि जिल्हा परिषदेकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप, फेसबुक तसेच विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करत असून, हवामान बदलाचा अभ्यास करून पाणी, खत आणि फवारणीचे अचूक नियोजन करण्यावर भर देत आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-२०२३’ प्रदान करण्यात आला आहे.
