कळसुलीत मुसळधार पावसाचा फटका; आंबा-फणस पिकांचे मोठे नुकसान
कळसुली | प्रतिनिधी :
गेल्या दोन दिवसांपासून कलसुली परिसरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि फणस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याची फळे झाडावरून गळून पडली असून फणसाच्या झाडांनाही फटका बसला आहे.
यावर्षी हंगाम चांगला राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र अवकाळी पावसामुळे तयार फळांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काही ठिकाणी बागांमध्ये पाणी साचल्याने फळांची गुणवत्ता खराब होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
विशेषतः हापूस आंबा उत्पादकांना या पावसाचा मोठा फटका बसला असून बाजारात पाठविण्यासाठी तयार ठेवलेली फळे खराब झाली आहेत. फणसाची लहान फळेही मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
