You are currently viewing सर्वांनी मनावर घेतल्यास सिंधुदुर्ग लवकरच होईल कुपोषणमुक्त : डॉ. सई धुरी

सर्वांनी मनावर घेतल्यास सिंधुदुर्ग लवकरच होईल कुपोषणमुक्त : डॉ. सई धुरी

सर्वांनी मनावर घेतल्यास सिंधुदुर्ग लवकरच होईल कुपोषणमुक्त : डॉ. सई धुरी

जिल्ह्यात केवळ २५ तीव्र कुपोषित बालके; स्तनपान सप्ताहात जनजागृती व पौष्टिक आहारावर भर

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत तीव्र कुपोषित मुलांची संख्या अत्यंत कमी असून, सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास जिल्हा लवकरच कुपोषणमुक्त होईल, असा ठाम विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला समितीच्या सचिव वैशाली काकडे, सदस्य अवनी तेली, हर्षदा वाळके, मिलिंद नाईक, आरती पाटील तसेच सर्व तालुक्यांचे बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. धुरी यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या २५ बालके तीव्र कमी वजनाची, तर ४५० बालके कमी वजनाची आहेत. अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या बालकांना दत्तक घेतले असून, त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, तीव्र कुपोषित बालकांचे पालक त्यांना १४ दिवस रुग्णालयात दाखल करण्यास तयार होत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर त्यांचे समुपदेशन करून औषधोपचार, तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्तनपान सप्ताहाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या सप्ताहात प्रत्येक गावातील मुख्य अंगणवाडी केंद्रात स्तनदा माता व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य स्तनपान, बालसंगोपन, औषधोपचार आणि स्थानिक पदार्थांपासून पौष्टिक आहार तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी समिती सदस्य स्वरूपा वाळके यांनी अंगणवाडीतील पोषण आहारात दर्जेदार कडधान्यांचा समावेश करावा, साखरेऐवजी गुळाचा वापर करावा तसेच आहार अधिक रुचकर असावा, अशी सूचना केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर गरोदर महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन करण्याची मागणीही त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा