You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार आर्थिक भरारी; २०२८ पर्यंत १० हजार कोटींच्या व्यवसायाचे लक्ष्य
Oplus_16908288

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार आर्थिक भरारी; २०२८ पर्यंत १० हजार कोटींच्या व्यवसायाचे लक्ष्य

सभासदांना १३% लाभांश; महिला बचतगटांची कर्जमर्यादा २० लाखांपर्यंत

४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा; अध्यक्ष मनीष दळवी यांची घोषणा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय ३१ मार्च २०२८ पर्यंत १० हजार कोटी रुपये करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच सभासदांना १३ टक्के लाभांश आणि अर्धा टक्का इन्सेंटिव्ह, महिला बचतगटांच्या विनातारण कर्जमर्यादेत ५ लाखांवरून २० लाखांपर्यंत वाढ, तसेच पात्र शेतकऱ्यांना सोसायट्यांमार्फत कमी व्याजदरात ५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शरद कृषी भवन येथे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, ॲड. प्रकाश बोर्डस, गणपत देसाई, महेश सारंग, समीर सावंत, प्रज्ञा ढवण, सौ. नीता राणे, रविंद्र मडगांवकर, विद्याधर परब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई उपस्थित होते.

दळवी यांनी सांगितले की, बँकेच्या ठेवींमध्ये ६०९.४५ कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण ठेवी ३९४२.५७ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. १८.२८ टक्के ठेवीवाढीसह कोकणातील जिल्हा बँकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक अव्वल ठरली आहे. कर्जवाटपात ४७२.०१ कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण कर्जे ३२३३.६४ कोटी रुपयांवर पोहोचली आहेत.

३१ मार्च २०२६ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ७१७६.२१ कोटी रुपये इतका झाला असून, प्रथमच ७ हजार कोटी रुपयांचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. बँकेचा एकूण निधी ६३३.६४ कोटी रुपये, ढोबळ नफा १४९.४३ कोटी रुपये आणि निव्वळ नफा ५० कोटी रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. बँकेचे ढोबळ एनपीए ३.४५ टक्के असून निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. तसेच भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण ११.९२ टक्के असून यंदाही बँकेला ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे.

दळवी यांनी पुढे सांगितले की, विकास संस्थांचे शंभर टक्के संगणकीकरण, डिजिटल बँकिंग, एईपीएस, डोअरस्टेप बँकिंग, ग्रीन चॅनेल काऊंटर तसेच ४४ बँक सखींच्या द्वारे ग्रामीण भागात प्रभावी बँकिंग सेवा पोहोचविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत बँकेकडून विविध प्रशिक्षण, बचतगटांना सहाय्य, कुपोषित बालकांसाठी उपक्रम तसेच इतर सामाजिक कार्यक्रमही राबविले जात आहेत.

दरम्यान, बँकेच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याच्या निर्णयालाही सभेने मंजुरी दिली असून, बँकेच्या कामकाजाबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा