बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि चित्रकला स्पर्धांचा समावेश; १ जुलैपर्यंत नावनोंदणीची संधी
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर सर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे.
या स्पर्धेत बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आणि चित्रकला या इनडोअर स्पर्धांचा समावेश आहे. बॅडमिंटन स्पर्धा इयत्ता १ ली ते ५ वी विद्यार्थी व विद्यार्थिनी, ६ वी ते १० वी विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि खुल्या गटात होणार असून टेबल टेनिस, कॅरम स्पर्धा १४ वर्षांखालील, टेबल टेनिस १९ वर्षांखालील तसेच खुल्या गटात आयोजित करण्यात आल्या आहेत. कॅरम स्पर्धेत १८ वर्षांखालील सिंगल आणि डबल्स असे दोन्ही प्रकार असतील. बुद्धिबळ स्पर्धा ११ वर्षांखालील तसेच १६ वर्षांखालील विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि खुल्या खुल्या गटात आयोजित करण्यात आली आहे.
चित्रकला स्पर्धा इयत्ता १ ली ते ५ वी ‘स्वच्छ सुंदर सावंतवाडी’, ६ वी ते १० वी ‘पर्यटनाची पंढरी, मोती तलाव आणि सावंतवाडीचे वैभव’, ११ वी ते १२ वी तसेच महाविद्यालयीन (FY, SY, TY) विद्यार्थ्यांसाठी ‘प्रजाहितदक्ष राजा – श्रीमंत बापूसाहेब महाराज’ हे विषय विविध गटांसाठी निश्चित करण्यात आले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य असून खुल्या गटातील स्पर्धकांसाठी कॅरम सिंगलसाठी रु. १०० व डबल्ससाठी रु. २०० प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारात प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धक असणे आवश्यक असून प्रत्येक खेळाडूला एका क्रीडा प्रकारात आणि एका गटातच सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेसाठी नावनोंदणी १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयातील संबंधित क्रीडा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे करता येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन ४ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता जिमखाना येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार असून ७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त क्रीडाप्रेमी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
