You are currently viewing सोनुर्लीच्या जाधव कुटुंबाचा दुर्दैवी अंत; सुवर्णा जाधव यांचीही उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

सोनुर्लीच्या जाधव कुटुंबाचा दुर्दैवी अंत; सुवर्णा जाधव यांचीही उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

सोनुर्लीच्या जाधव कुटुंबाचा दुर्दैवी अंत; सुवर्णा जाधव यांचीही उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

अजय आणि चिमुकल्या अथर्वनंतर पत्नी सुवर्णाचाही मृत्यू; संपूर्ण गाव शोकसागरात, घटनेमागील कारणांचा गोवा पोलिसांकडून तपास

सावंतवाडी

म्हापसा-करासवाडा येथील भाड्याच्या खोलीत शनिवारी सकाळी सोनुर्ली येथील अजय देऊ जाधव आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा अथर्व यांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेत गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या अजय यांच्या पत्नी सुवर्णा जाधव (वय ३०) यांची गोव्यातील गोमेकॉ रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यामुळे जाधव कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे निधन झाल्याने सोनुर्लीसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

रविवारी दुपारी अजय आणि चिमुकल्या अथर्व यांच्या पार्थिवावर सोनुर्ली येथील जाधववाडीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. चिमुकल्या अथर्वचा निष्प्राण देह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
मूळचे सोनुर्ली येथील रहिवासी असलेले अजय जाधव हे नोकरीनिमित्त गेल्या वर्षभरापासून पत्नी सुवर्णा आणि मुलगा अथर्व यांच्यासह म्हापसा-करासवाडा येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. शनिवारी सकाळी त्यांची खोली बराच वेळ बंद असल्याने संशय निर्माण झाला. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर अजय आणि अथर्व मृतावस्थेत आढळले, तर सुवर्णा गंभीर जखमी अवस्थेत सापडल्या. त्यांना तातडीने गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचेही निधन झाले.
या हृदयद्रावक घटनेमुळे सोनुर्लीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणामागील नेमके कारण काय, याचा तपास गोवा पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा