You are currently viewing गोविंद चित्र मंदिर परिसरातील धोकादायक सुकलेले झाड अखेर हटविले; नगरपरिषद व झाडमालकाचे रवी जाधव यांच्याकडून आभार

गोविंद चित्र मंदिर परिसरातील धोकादायक सुकलेले झाड अखेर हटविले; नगरपरिषद व झाडमालकाचे रवी जाधव यांच्याकडून आभार

गोविंद चित्र मंदिर परिसरातील धोकादायक सुकलेले झाड अखेर हटविले; नगरपरिषद व झाडमालकाचे रवी जाधव यांच्याकडून आभार

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शहरातील अन्य धोकादायक झाडेही तातडीने हटविण्याची मागणी

सावंतवाडी | प्रतिनिधी :
गोविंद चित्र मंदिर परिसरातील रस्त्यालगत अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत उभे असलेले सुकलेले झाड अखेर तोडण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामाबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रवी जाधव यांनी सावंतवाडी नगरपरिषद तसेच संबंधित झाडमालकाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
हे झाड अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत होते. त्याच्या सुकलेल्या फांद्या पडून यापूर्वी दोन अपघातही घडले होते. याबाबत रवी जाधव यांनी वारंवार निवेदने देत नगरपरिषदेचे लक्ष वेधले होते. पावसाळा तोंडावर असताना कोणतीही जीवितहानी होऊ नये, या उद्देशाने त्यांनी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतर नगरपरिषदेकडून झाडमालकाला नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर संबंधित धोकादायक झाड तोडण्यात आले. आता शहरातील तसेच महामार्गालगत उभ्या असलेल्या इतर धोकादायक झाडांवरही तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रवी जाधव यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा यांच्या सहकार्याने शहरातील अनेक धोकादायक झाडे हटविण्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील १३३ धोकादायक खड्डे स्वखर्चाने सिमेंट काँक्रीटने बुजविण्यात आले, तर ६४ गतिरोधकांवर पांढरे पट्टे रंगविण्यात आले होते. या उपक्रमांमुळे अनेक संभाव्य अपघात टळण्यास मदत झाली असून, काही ठिकाणचे रस्ते आजही चांगल्या स्थितीत आहेत.
नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सातत्याने नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक सूचना देत असते. प्रशासनाकडूनही या उपक्रमांना सहकार्य मिळत असल्याचे रवी जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी, “आपत्कालीन परिस्थितीत जनतेच्या सेवेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सदैव तत्पर असून नागरिकांनीही धोकादायक झाडे, खड्डे अथवा अन्य सार्वजनिक समस्यांची माहिती द्यावी,” असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा