प्लस पोलिओ लसीकरण 28 जून 2026 रोजी सावंतवाडी तालुक्यात पल्स पोलिओ टास्क फोर्स समितीची तर्फे लाभ घेण्याचे आव्हान.
सावंतवाडी :
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुकास्तरीय पल्स पोलिओ टास्क फोर्स समितीची सभा मा. अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रतिनिधी, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य, पत्रकार बांधव, गट प्रवर्तक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तसेच टास्क फोर्स समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली, सांगेली, बांदा, निरवडे, मळेवाड तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागात 28 जून 2026 रोजी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले.
बैठकीत मा. अध्यक्ष यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देताना ज्या ठिकाणी पोलिओ लसीकरण बूथ कार्यान्वित करण्यात येणार आहेत अशा प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्रे, उपकेंद्रे व इतर ठिकाणांच्या इमारतींच्या चाव्या 27 जून 2026 रोजी ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. तसेच 28 जून रोजी नियोजित वेळेपूर्वी सर्व बूथवर लस उपलब्ध करून देणे, नियुक्त कर्मचारी वेळेत उपस्थित राहणे व स्थानिक मान्यवरांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
यावेळी एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, विशेषतः स्थलांतरित व मजूर कुटुंबातील बालकांपर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यावर भर देण्यात आला. तसेच सर्व शासकीय व निमशासकीय विभागांनी 28 जून रोजी जनजागृती उपक्रम राबवून मोहिमेस आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
सावंतवाडी तालुक्यात एकूण 110 पल्स पोलिओ लसीकरण बूथ, 12 मोबाईल पथके व 8 ट्रान्झिट पथकांची स्थापना करण्यात आली असून 0 ते 5 वर्षे वयोगटातील 5,057 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
टास्क फोर्स समितीच्या वतीने सर्व पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, 28 जून 2026 रोजी आपल्या परिसरातील जवळच्या पल्स पोलिओ लसीकरण बूथवर जन्म ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना घेऊन जावे व पोलिओ प्रतिबंधक डोस पाजून या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेत सहभागी व्हावे असे टास्क फोर्स समिती, सावंतवाडी यांच्या वतीने रवी जाधव यांनी आवाहन केले आहे.
