You are currently viewing महाराष्ट्र रत्न पुरस्काराने रंगराव राऊ प्रधान यांचा गौरव

महाराष्ट्र रत्न पुरस्काराने रंगराव राऊ प्रधान यांचा गौरव

संगमनेर : (बबनराव आराख) कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील पंडेवाडी गावचे ज्येष्ठ सुपुत्र, भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते रंगराव राऊ प्रधान यांना प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान त्यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव असला, तरी तो पंडेवाडी गाव, राधानगरी तालुका, कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व वैचारिक परंपरेचा अभिमान आहे.

तेजस सेवा प्रतिष्ठानच्या वतीने संगमनेर येथे आयोजित भव्य सोहळ्यात रंगराव राऊ प्रधान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. संविधान अमृत महोत्सवाचे अध्यक्ष अॅड. संगराज दादासाहेब रुपवते, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. मुकुंद भारसाकळे तसेच भन्ते के. सुबोध बोधी यांच्या हस्ते रंगराव राऊ प्रधान यांचा सन्मान करण्यात आला.आदरणीय अध्यक्ष महोदयांनी रंगराव राऊ प्रधान यांच्या निष्ठावंत कार्याचे कौतुक केले. त्यांनी व्यक्तिशः समता, बंधुता, न्याय आणि मानवतेच्या विचारांचे निष्ठेने प्रतिनिधित्व केले आहे. समाजातील उपेक्षित, वंचित, गरजू आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.रंगराव राऊ प्रधान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पंडेवाडी येथील विद्या मंदिर शाळेमध्ये विशेष माहितीपट सादर केला. लॉर्ड बुद्ध चॅनेलच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांसमोर हा उपक्रम घेण्यात आला. माहितीपटात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक जीवनापासून ते त्यांच्या उच्च स्थानापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासाची प्रभावी मांडणी करण्यात आली. संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान, विविध विधेयके, कायदे, सामाजिक न्यायाची भूमिका आणि वंचित समाजासाठी केलेले कार्य याबाबत प्रेरणादायी माहिती देण्यात आली.

भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी रंगराव राऊ प्रधान यांनी सातत्याने कार्य केले आहे. समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर म्हणून त्यांनी विविध सामाजिक, प्रबोधनात्मक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

पंडेवाडी गावातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांना एकत्र घेऊन त्यांनी शिक्षण समूहाच्या वाटचालीत मोठे योगदान दिले आहे. गावातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजात आदर्श नागरिक म्हणून घडावे, या उद्देशाने ते सतत मार्गदर्शन करीत असतात.महाराष्ट्र रत्न पुरस्कारामुळे पंडेवाडी गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा सन्मान गावाच्या उन्नतीसाठी, शिक्षणासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस प्रेरणा देणारा आहे. रंगराव राऊ प्रधान यांचे कार्य पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार असून, त्यांच्या कार्यातून पंडेवाडी गावाचे नाव राज्याच्या नकाशावर अधिक उजळले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा