दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाला अखेर पदनिर्मितीची मंजुरी
२० नव्या पदांमुळे आरोग्यसेवा बळकट; पालकमंत्री नितेश राणे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार दीपक केसरकर यांचे सहकार्य
दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्याच्या आरोग्यसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठत उपजिल्हा रुग्णालयासाठी अखेर पदनिर्मितीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांसह विविध कर्मचाऱ्यांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला असून तालुक्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि प्रभावी होणार आहे.
उपसभापती तथा शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी ही माहिती देत यासाठी सहकार्य करणारे पालकमंत्री , आरोग्यमंत्री तसेच स्थानिक आमदार यांचे आभार मानले आहेत.
२० नव्या पदांची निर्मिती
दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयासाठी एकूण २० नव्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच इतर आवश्यक कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यामुळे रुग्णांना अधिक दर्जेदार आणि वेळेत उपचार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
इमारतीनंतर आता मनुष्यबळाचीही उपलब्धता
उपजिल्हा रुग्णालयाची इमारत उभारल्यानंतर आवश्यक पदनिर्मितीचा प्रश्न प्रलंबित होता. आता शासनाकडून पदांना मंजुरी मिळाल्याने रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी बाहेरच्या ठिकाणी जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
आमदार केसरकरांनी घेतला होता स्पॉट आढावा
काही दिवसांपूर्वी आमदार दीपक केसरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्यसेवेचा आढावा घेतला होता. त्यानंतर पदनिर्मितीचा विषय शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता.
राज्यातील १२ उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दोडामार्गचा समावेश
राज्यात नव्याने मंजूर करण्यात आलेल्या १२ उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाचाही समावेश असून, या निर्णयामुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
