You are currently viewing दहा वर्षांहून अधिक जुन्या ग्रामसडकांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधी प्रस्ताव पाठविणार
Oplus_16908288

दहा वर्षांहून अधिक जुन्या ग्रामसडकांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधी प्रस्ताव पाठविणार

जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत महत्त्वाचा निर्णय

कुंदे-आंब्रड पुलावरील भराव खचल्याप्रकरणी ठेकेदाराला तातडीच्या दुरुस्तीचे आदेश

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यातील दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झालेल्या आणि सध्या नादुरुस्त अवस्थेत असलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत घेण्यात आला.

बांधकाम समितीचे सभापती संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सचिव तथा कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, सदस्य रुपेश कानडे, केशव नारकर, संजय बोबडी, दीपलक्ष्मी पडते, सुदन कवठणकर यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. सभेत जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या अनेक रस्त्यांची सध्याची दयनीय अवस्था चर्चेचा विषय ठरली.

अनेक रस्त्यांना दहा वर्षांहून अधिक कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची आवश्यकता आहे. यासाठी मोठ्या निधीची गरज असून शासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सभापती संतोष साटविलकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी येणाऱ्या फाईली किती टेबलांवर फिरतात आणि त्यासाठी किती कालावधी लागतो, याबाबतची माहिती सदस्यांनी मागील सभेत मागितली होती. यावर चर्चा करताना केवळ बांधकाम विभागापुरतीच नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमधील फाईल प्रक्रियेची माहिती पुढील सभेत सादर करावी, अशा सूचना सभापतींनी केल्या.

जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांची माहितीही मागील सभेत मागविण्यात आली होती. मात्र ती माहिती अद्याप उपलब्ध न झाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील सभेत संपूर्ण आणि अचूक माहिती सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

कुंदे-आंब्रड मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरील भराव पहिल्याच पावसात खचल्याची बाब सभेत उपस्थित करण्यात आली. आंबड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्या दीपालक्ष्मी पडते यांनी या गंभीर प्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधून संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

यावर सभापती संतोष साटविलकर यांनी संबंधित ठेकेदाराला खचलेला भराव त्वरित पूर्ववत करून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्याच्या सूचना देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा