You are currently viewing तरंदळे ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

तरंदळे ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

तरंदळे ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा

सततच्या लोडशेडिंगसह धोकादायक वायरी, पोल आणि झाडकटाईच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांशी चर्चा; १५ दिवसांत उपाययोजनांचे आश्वासन

कणकवली

तरंदळे गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, LT व ST लाईनवरील झाडांच्या फांद्या, धोकादायक स्थितीतील पोल तसेच खराब झालेल्या वायरी यांसारख्या गंभीर समस्यांमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आज महावितरणच्या कणकवली कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना समस्यांचा जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. भामरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. गावातील LT आणि ST लाईनवरील झाडे तातडीने कापणे, जीर्ण व पडण्याच्या स्थितीतील पोल बदलणे, जळालेल्या वायरींची दुरुस्ती करणे तसेच लाईन लिंक करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
चर्चेनंतर सहाय्यक अभियंता भामरे यांनी गावातील सर्व तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. येत्या १५ दिवसांत झाडकटाई, पोल दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामे पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या शिष्टमंडळात सरपंच सुशिल कदम, ग्राम शालेय शिक्षण व सामाजिक उपक्रम समितीचे अध्यक्ष डॉ. सत्यवान राणे, तसेच ग्रामपंचायत सदस्य तेजस सावंत, देवा रावले, अमित सावंत, किरण सामंत, राजाराम सावंत, अमोल गावकर आणि ओमकार सावंत सहभागी झाले होते.
दरम्यान, वीज समस्यांबाबत ग्रामपंचायतीने घेतलेल्या पुढाकाराचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून, दिलेल्या आश्वासनानुसार कामे पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच सुशिल कदम यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा