पहिल्याच पावसात मालवण दोन दिवस अंधारात; वैभव नाईकांचा महावितरणवर हल्लाबोल
महावितरण कार्यालयावर शिवसैनिकांसह धडक; निष्काळजीपणा आणि सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेवर टीका
मालवण
पहिल्याच पावसाने महावितरणच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज कार्यकर्त्यांसह मालवण येथील महावितरण कार्यालयावर धडक देत तीव्र संताप व्यक्त केला. सलग दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला असून यासाठी महावितरणचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
महावितरणचे मुख्य अधिकारी सचिन मेहेत्रे कार्यालयात अनुपस्थित असल्याने शिवसैनिकांचा संताप आणखी वाढला. वर्षभर देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मात्र पहिल्याच पावसात दोन-दोन दिवस वीजपुरवठा खंडित होत असेल, तर महावितरणने नेमके कोणती कामे केली, असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला.
तीन मुख्य वाहिन्या एकाचवेळी बंद कशा?
मालवण शहराला आचरा, विरण आणि कुडाळ या तीन मुख्य वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा केला जातो. पहिल्याच पावसात तिन्ही वाहिन्या एकाचवेळी निकामी होणे गंभीर बाब असल्याचे सांगत, मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले गेले का, असा जाब नाईक यांनी विचारला.
भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामावरही प्रश्नचिन्ह
तालुक्यात सुरू असलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी या वाहिन्या जमिनीच्या वर आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत हे काम तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे समाधानकारक होत नाही, तोपर्यंत महावितरणने या वाहिन्या ताब्यात घेऊ नयेत, अशा सूचना त्यांनी कुडाळच्या कार्यकारी अभियंत्यांना दूरध्वनीद्वारे दिल्या.
‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा
यापुढे वीजपुरवठा विनाकारण खंडित झाला किंवा भूमिगत वाहिन्यांच्या कामात हलगर्जीपणा आढळल्यास महावितरणला अधिक तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख किरण चव्हाण, उमेश चव्हाण, नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, अनिता गिरकर, उमेश मांजरेकर, राजू मेस्त्री, महेश जावकर, भगवान लुडबे, अमोल वस्त, किशोर गावकर, सिद्धेश मांजरेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
