You are currently viewing दोडामार्ग-सावंतवाडीतील तीन महत्त्वाच्या पुलांना केंद्राची मंजुरी
Oplus_16908288

दोडामार्ग-सावंतवाडीतील तीन महत्त्वाच्या पुलांना केंद्राची मंजुरी

पंतप्रधान ग्रामसडक योजना भाग-३ अंतर्गत ८ कोटी ६७ लाख ४० हजारांचा निधी; आमदार दीपक केसरकर व खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला असून केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-३’ अंतर्गत दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील तीन प्रमुख पुलांच्या बांधकामांना मंजुरी मिळाली आहे. या तीन पुलांसाठी एकूण ८ कोटी ६७ लाख ४० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि संपर्क तुटण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होणार आहे.

सावंतवाडीचे लोकप्रिय आमदार दीपकभाई केसरकर यांच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून केंद्र सरकारने या कामांना हिरवा कंदील दाखवला आहे.

मंजूर झालेल्या कामांमध्ये पडवे–कोलझर–कुंभावडे–पणतुर्ली रस्त्यावरील (साखळी क्र. २/५५०) २२ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ७८.०५ लाख रुपये, भेडशी–खानयाळे–शिरंगे पुनर्वसन रस्त्यावरील ४० मीटर लांबीच्या पुलासाठी ३ कोटी ४७.५८ लाख रुपये तसेच बांदा मच्छीमार्केट–बांदेश्वर मंदिर ते सटमट डिंगणे रस्त्यावरील (साखळी क्र. १/४७०) २४.०५ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ४१.७७ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

या तिन्ही ग्रामीण रस्त्यांवरील पुलांच्या निर्मितीमुळे परिसरातील गावांचा मुख्य शहरांशी असणारा संपर्क अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वाहतूक आणि रहदारीच्या गंभीर समस्यांवर या कामांमुळे कायमस्वरूपी तोडगा निघणार असल्याने स्थानिक जनतेत समाधान व्यक्त होत आहे.

मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेसाठी अत्यंत आवश्यक असणारी ही तीन पुलांची कामे मंजूर केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान आणि खासदार नारायणराव राणे यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा