श्रीदेवी माऊली असनिये ग्रामविकास मंडळ मुंबईचा शैक्षणिक उपक्रम; १०० टक्के निकालाबद्दल शिक्षकांचे कौतुक
सावंतवाडी : श्रीदेवी माऊली असनिये ग्रामविकास मंडळ, मुंबई यांच्या माध्यमातून श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असनिये येथील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम प्रशालेचे संस्थापक मा. श्री. एम. डी. सावंत सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी श्री. भरत सावंत (ग्रामपंचायत सदस्य), श्री. लक्ष्मण सावंत, श्री. चंद्रकांत भिसे तसेच प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. गवस मॅडम उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सावंत मॅडम यांनी प्रास्ताविक करताना श्रीदेवी माऊली असनिये ग्रामविकास मंडळाने प्रशालेला दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात मा. श्री. एम. डी. सावंत सर यांनी समाजातून मिळणाऱ्या या दातृत्वाचे ऋण लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा व प्रशालेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखावी, असे आवाहन केले.
तसेच शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दहावीचा १०० टक्के निकाल लागल्याबद्दल त्यांनी प्रशालेच्या सर्व शिक्षकवर्गाचे विशेष कौतुक केले.
श्रीदेवी माऊली असनिये ग्रामविकास मंडळाच्या या शैक्षणिक योगदानाबद्दल पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक राठोड सर, लिपिक श्री. जी. बी. सावंत, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री. परेश देसाई यांनी केले.
