You are currently viewing आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या

आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या

आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा इशारा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा इशारा

कुडाळ :

वेंगुर्ला तालुक्यातील आजगाव दशक्रोशी परिसरातील ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे. तसेच आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

अमित सामंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ला तालुक्यातील आजगाव, धाकोरे, आरवली, सोन्सुरे, मळेवाड, सखेखोल आणि आसोली या सात गावांतील ग्रामस्थांनी ग्रामसभांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला सातत्याने विरोध दर्शविला आहे. असे असतानाही संबंधित प्रशासनाने जेएसडब्ल्यू कंपनीला परवानगी देताना ग्रामसभांच्या अधिकारांवर गदा आणली आहे. हा निर्णय कोणाच्या राजकीय दबावाखाली घेण्यात आला, याची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

ग्रामसभांना संविधानाने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन होत असेल, तर ग्रामसभांच्या निर्णय प्रक्रियेला महत्त्व का दिले जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ग्रामस्थांच्या मताला किंमत नसेल तर ग्रामसभांच्या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले.

जेएसडब्ल्यू कंपनीच्या ड्रोन सर्वेक्षणावेळी काही अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांची नावे घेत दडपणाचे वातावरण निर्माण केल्याचा आरोपही सामंत यांनी केला. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाने मायनिंग प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वीही अनेक वादग्रस्त व पर्यावरणाला हानीकारक प्रकल्प आणण्याचे प्रयत्न झाले असून भविष्यातही असे प्रयत्न होण्याची शक्यता असल्याचे सांगत, जिल्ह्यातील जनतेने अशा प्रकल्पांविरोधात एकजूट दाखविण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र विरोध करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततामय मार्गाने संघर्ष करण्याचे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले.

दरम्यान, मायनिंग सर्वेक्षणाबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची प्रमुख मागणी असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा गर्भित इशारा देत आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या लढ्यात पक्ष त्यांच्या सोबत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा