You are currently viewing मालवण-दांडी येथे विजेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू

मालवण-दांडी येथे विजेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू

मालवण

मालवण शहरातील दांडी झालझुल वाडी येथे असणाऱ्या विजेच्या खांबातून प्रवाहित झालेल्या विजेचा स्पर्श झाल्याने सखाराम अनंत सातार्डेकर रा. वायरी यांच्या मालकीच्या दुभत्या गायीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दांडी झालझुल वाडी येथे असणाऱ्या विजेच्या खांबाला असलेल्या वीज वाहिन्या या खंडित झाल्याने विद्युत खांबाला शॉक येत होता. त्या विद्युत खांबाला कुंपणाच्या तारा स्पर्श होत असल्याने रविवार रात्री पासून स्पार्किंग होत होते. याबाबत वीज वितरण मालवण कार्यालयात नागरिकांनी तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

त्यामुळे आजची दुर्घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, युवासेना शहर प्रमुख तपस्वी मयेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. वीज कर्मचारी, पोलीस व पशु वैद्यकीय अधिकारी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला.

एकूणच गाईच्या मृत्यूस वीज वितरण जबाबदार असल्याचा आरोप सातार्डेकर कुटुंबीयांनी केला आहे. उपस्थित नागरिकांनीही वीज वितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. कुंपणाची तारही वितळली ज्या वीज खांबाला शॉक येत होता त्याला कुंपणाची लोखंडी तार स्पर्श करून होती.

वीज खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्याने खांबाला स्पर्श केलेली कुंपण तारही वितळून गेल्याचे दिसून आले. तर तार लगतच साचलेल्या पाण्यातून जात असल्याने त्या पाण्याच्या डबक्यातील मासे बेडुकही शॉक लागून मृत झाल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा