अधिक महिन्याची भक्तिमय सांगता; फोंडाघाटच्या श्री राधाकृष्ण मंदिरात ५ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
फोंडाघाट
अधिक महिना समाप्तीनिमित्त फोंडाघाट येथील श्री राधाकृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिनाभर दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत मंदिरात आरती होत होती. या धार्मिक उपक्रमात भाविक, व्यापारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत होते.
अधिक महिन्याच्या समारोपानिमित्त आज सायंकाळी मंदिरात ह.भ.प. गोखले बुवा यांचे सुस्वर कीर्तन संपन्न झाले. त्यानंतर आरती, हरिपाठ तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी मंदिर परिसरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादामध्ये जिलेबी, बुंदी लाडू, खीर, भात, वरण, लोणचे, पापड, मिठाई, मिक्स भाजी आणि सोलकढी यांसह विविध स्वादिष्ट पदार्थांचा समावेश होता. उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा मनमुराद आस्वाद घेतला.
या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक, व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री राधाकृष्ण मंदिरावरील प्रेम व श्रद्धेपोटी सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यापूर्वी झालेल्या आरती कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी श्रीचरणी बुंदी लाडूचा प्रसाद अर्पण केला होता. यावेळी आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात तसेच कुटुंबाचे रक्षण व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी केली. ही आपल्या श्रद्धेची भावना असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे नियोजन मंदिर समिती व स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले. सुमारे ५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
“श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवाय” या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
