शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघुउद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध; ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार
कणकवली / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या ‘गावठी आठवडा बाजार’ चे उद्घाटन पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपक्रमामुळे स्थानिक उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, ग्रामीण अर्थकारणावर जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न अवलंबून असते. या गावठी बाजारपेठेमुळे नागरिकांना स्थानिक स्तरावर दर्जेदार, ताजी आणि विश्वासार्ह उत्पादने उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर शेतकरी, महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी थेट व्यासपीठ मिळणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.
खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या उपक्रमाचे अनुकरण जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांनीही करावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा बाजारपेठांमुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट संबंध दृढ होतील तसेच स्थानिक उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
उद्घाटनानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी बाजारातील विविध स्टॉलना भेट देत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या भाज्या, फळे, सेंद्रिय शेतीमाल, घरगुती खाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि विक्रेत्यांशी संवाद साधून उत्पादनांची माहिती जाणून घेतली. तसेच या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल शेतकरी, महिला बचत गट आणि विक्रेत्यांचे अभिनंदन केले.
