करंजेतील आदिवासी बांधवांच्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा उत्साहात
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्यांचे वितरण; सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध
करंजे :
प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत करंजे गावात चार घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी सर्व चारही घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लाभार्थी भूमिहीन असल्याने त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय (PDU) योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी श्रीमती वैजयंती मौर्य, शिवाजी वाळके, विठ्ठल वाळके, श्रीमती निर्मला परब आणि श्रीमती मयुरी शिरसाठ यांनी एकूण ४ आर क्षेत्र बक्षीसपत्राद्वारे उपलब्ध करून दिले.
सदर जमीन खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय (PDU) योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी ३१ हजार ३०५ रुपये प्रमाणे चार लाभार्थ्यांना एकूण १ लाख २५ हजार २२० रुपयांचे अनुदान शासनाकडून देण्यात आले. तसेच प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत प्रत्येक घरकुलासाठी २ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत मजुरीपोटी एकूण १ लाख ४ हजार ५२० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.
या घरकुलांना सोलर पंपाद्वारे पाणीपुरवठा तसेच वीज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या गृहप्रवेश सोहळ्यास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सभापती हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपसभापती राजेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सरपंच श्रीमती मेस्त्री, ग्रामसेवक ऋतुराज कदम यांच्यासह विविध मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
