You are currently viewing राजघराण्यावर स्वकीयांकडून आरोप; बोलविता धनी कोण…?

राजघराण्यावर स्वकीयांकडून आरोप; बोलविता धनी कोण…?

संपादकीय…..

राजघराण्यावर स्वकीयांकडून आरोप; बोलविता धनी कोण…?

श्रीमंत पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा वारसा लाभलेलं आणि रामराज्य म्हणून ज्या राजघराण्याचा उल्लेख झालेला त्या राजघराण्यातील युवराज्ञी सावंतवाडी शहराच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाली आणि सावंतवाडी पुन्हा एकदा विकासाकडे अग्रेसर होईल अशी आशा पल्लवीत झाली होती. परंतु, नियतीला कदाचित सावंतवाडीचा विकास मंजूर नव्हता किंवा काहींच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आड येत गेल्या. त्यामुळे एकीकडे एकहाती सत्ता मिळालेल्या भाजपमध्ये सुंदोपसुंदी असल्याचे जगजाहीर होऊ लागले. उपनगराध्यक्ष पदावर विराजमान असलेले ॲड अनिल निरवडेकर यांनी नगराध्यक्षांच्या रजा कालावधीत प्रभारी नगराध्यक्ष म्हणून लोकाभिमुख
काम पाहून नंतर अचानक त्यांनी नगरपालिकेच्या राजकारणापासून हळूहळू फारकत घेतली. तेव्हाच नगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपा मध्येच धुसफूस असल्याचे दिसून आले. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले या राजघराण्यातून आल्याने त्यांची एककल्ली निर्णयक्षमता इतरांना टोचू लागली, काहींना खटकू लागली. राजवाड्याच्या परिसरात नगरसेवकांना घेऊन केलेली साफसफाई मोहीम म्हणजे राजवाड्याचे सेवक केल्याची बोचरी टीका झाली एवढंच नव्हे तर पावसाळा समोर आलेला असताना शहरात रस्त्याच्या एका बाजूने गॅस पाइपलाइन खोदाई आणि दुसऱ्या बाजूने नवीन पाण्याची पाइपलाइन खोदाई अशी सुरू केलेली कामे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचे आरोप झाले. नगराध्यक्षा या राजघराण्याचा भाग असल्याने त्यांच्यावर झालेले आरोप म्हणजे राजघराण्यावर झालेले आरोप आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्षा पदी भाजपाच्या श्रद्धाराजे भोसले विराजमान असताना अपक्ष म्हणून निवडून आलेले पण भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मर्जीतले असलेल्या भाजपच्याच एका लोकप्रतिनिधींनी राजघराण्यावर आरोप करण्याची हिंमत कशी केली..? असा सवाल आज सावंतवाडी शहरात जिकडे तिकडे विचारला जात असून या आरोपामागील बोलवता धनी कोण…? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोलगाव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात भाजपचेचं सदस्य असलेले मायकल डिसोजा अपक्ष म्हणून उभे राहिले. काही भाजपा कार्यकर्ते वगळता भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जवळचे सर्व कार्यकर्ते खुलेआम अपक्ष उमेदवाराचा प्रचार करत होते आणि त्यांचे मेहुणे विनोद राऊळ हे देखील मायकल डिसोजा यांच्या समर्थनार्थ पडद्यामागून सूत्र हलवित राहिले. निवडणूक निकालानंतर खुलेआम अपक्ष उमेदवाराला समर्थन करत गुलाल उधळून पोस्टरबाजी देखील करत होते. रवींद्र चव्हाण यांचे फोटो देखील किंगमेकर म्हणून मायकल डिसोजा यांच्या पोस्टरवर झळकत होते. त्यामुळे मायकल डिसोजा यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या डोक्यावर हात असल्यानेच स्वतःच्या पक्षाच्या नगराध्यक्षांवर आरोप करण्याची हिंमत केली की काय? असा प्रश्न साहजिकच लोकांना पडला आहे. सावंतवाडीचे राजघराणे हे रामराज्य म्हणून ओळख असलेलं घराणे असून श्रीमंत शिवराम राजे भोसले यांनी आमदारकी भोगली आहे, काही काळ राजमाता याही राजकारणात सक्रीय होत्या…. पण त्या काळात राजघराण्याबद्दल आदर कायम होता. राजघराण्यावर आरोप सोडाच राजकीय टीकाही होत नव्हती. युवराज लखमराजे राजकारणात सक्रीय झाले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या, जनतेचा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळू लागला आणि राजघराण्याला हळूहळू राजकीय टीकेला सामोरे जावे लागले.
प्रचारादरम्यान सावंतवाडीकरानी श्रद्धाराजेचे राजघराण्यातील सदस्य म्हणून आदराने स्वागत केलं होतं, युवराज्ञी म्हणून काहींनी आपल्या घरात आल्यावर ओवाळले, चरण स्पर्शही केला होता. राजघराण्याबद्दल सावंतवाडीवासियांना असलेला आदर पाहून त्याही भारावून गेल्या होत्या. परंतु नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर होत असलेले आरोप शांतता प्रिय राजकारणाला कलाटणी देणारे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे राजकारण हे राणे समर्थक आणि चव्हाण समर्थक अशा दोन गटात विभागले गेले आहे; त्यात कोण कोणाचे समर्थक आहेत हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज भासत नाही…आणि सावंतवाडीची जनता एवढीही दुधखुळी सुद्धा मुळीच नाही.
“आम्ही निष्ठावंत” भाजपचेच अपक्ष म्हणून निवडून आलेले मायकल डिसोजा यांनी भाजपच्या नगराध्यक्षांवर थेट गंभीर आरोप केल्याने सावंतवाडीकरांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, मायकल डिसोजा हे कोणाचे प्यादे आहेत हे न जाणायला आजकाल सोशल मिडिया कोळून पिणारी सावंतवाडीची जनता वेडी नाही आहे. मायकल डिसोजा यांनी केलेल्या आरोपाचे खंडण करण्यासाठी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. आरोपांचे खंडन करताना त्या व्यथीत झाल्या होत्या, ते स्वाभाविकच होतं. कारण आरोप केवळ नगराध्यक्षांवर झाले नव्हते तर ते रामराज्य अशी ओळख असणाऱ्या राजघराण्यावर झाले होते. ग्रो बिग टेक्नॉलॉजी ही खाजगी संस्था असून तिला कमी दरात किंवा मोफत जागा देता येणार नाही. नगरपालिकेची जागा ही शासनाची असल्याने नगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नगराध्यक्षांनी प्रयत्न केले यात गैर काहीच नव्हते. परंतु एक रूम भाड्याने घेऊन तीन रूमचा वापर करत असून नगरपालिकेने ठरवून दिलेले भाडे न भरता काचेच्या दरवाजांना टाळे ठोकले अशी ओरड करणे म्हणजे अतिशयोक्ती असून सावंतवाडी शहराच्या बाहेरील एखादी व्यक्ती नगरपालिकेच्या आस्थापनात आधार शोधत आली असताना मिळालेला आधार ही सुंदरवाडीतील लोकांनी केलेली मदत म्हणून स्वीकारण्यापेक्षा सावंतवाडीच्या नगराध्यक्षांवरच गंभीर आरोप करणे म्हणजे शिरजोर होण्यासारखे आहे आणि ही शिरजोरी कोणाच्या जिवावर…? हे देखील जनतेला माहिती आहे.
काही काळापूर्वी भाजपा शहर महिला अध्यक्ष सौ.मोहिनी मडगावकर यांनी राजीनामा देत तालुकाध्यक्ष महेश सारंग यांचे नाव घेत थेट आरोप केले होते, इथूनच भाजपात सुंदोपसुंदी असल्याचे स्पष्ट झाले होते. पुढे त्याचे काय झाले हे सर्वच जाणून आहेत. याचाच एक भाग म्हणजे भविष्यात सावंतवाडी विधानसभेची जागा कोणीतरी आपल्या सत्तेच्या आणि पैशांच्या जोरावर आपल्याच घरातील व्यक्तीच्या पदरात पाडून घेण्यासाठी आतापासून सावंतवाडीतील भाजप मध्ये सुरुंग तर लावत नाही ना..? असा छुपा प्रश्न आज सावंतवाडीतील राजकीय धुरंदरांच्या डोक्यात उत्पन्न झाला असून आज जे भविष्यात सावंतवाडी मतदारसंघाचा आमदार होण्याची स्वप्ने रंगवून कोणाच्या चटई, थाळी आणि तळी उचलतात त्यांच्यासाठी कदाचित ही धोक्याची घंटा असेल. त्यामुळेच सावंतवाडी सारख्या शांत सुसंस्कृत नगरपालिकेत, शहरात विनाकारण अशांतता पसरविण्याचा कट तर रचला जात नाही ना..? असा प्रश्न पडत आहे…आणि जर असा डाव खेळला जात असेल तर नगराध्यक्षा अर्थात राजघराण्यावर आरोप करणाऱ्या कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांच्या आरोपा मागील बोलविता धनी कोण…? हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे… कारण “आम्ही निष्ठावंत भाजपचेच” म्हणणारे भाजपच्याच नगराध्यक्षांवर आरोप करत आहेत हे अनाकलनीय आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा