You are currently viewing बार कौन्सिल निवडणुकीत अॅड. संग्राम देसाईंचा दणदणीत विजय

बार कौन्सिल निवडणुकीत अॅड. संग्राम देसाईंचा दणदणीत विजय

बार कौन्सिल निवडणुकीत अॅड. संग्राम देसाईंचा दणदणीत विजय

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलमध्ये सहाव्या क्रमांकाने निवड; सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेकडून जंगी सत्कार, वकिलांसाठी ‘अॅक्शन प्लॅन’ जाहीर

कुडाळ :

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गचे सुपुत्र अॅड. संग्राम देसाई यांनी ऐतिहासिक यश संपादन करत सहाव्या क्रमांकाची सर्वाधिक पसंतीची मते मिळवून विजय मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुडाळ येथील लाईम लाईट हॉटेलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मतदार वकिलांचे आभार मानत वकिलांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना अॅड. देसाई यांनी सांगितले की, बार कौन्सिलच्या निवडणुकीत यंदा १५५ उमेदवार रिंगणात होते. कठोर पडताळणीनंतर १ लाख ७० हजार वकील मतदानासाठी पात्र ठरले होते. प्रस्थापित आणि अनेकदा निवडून आलेल्या उमेदवारांशी स्पर्धा करत मतदारांनी आपल्याला सहाव्या क्रमांकाने निवडून दिले, याबद्दल त्यांनी राज्यभरातील वकील बांधवांचे आभार मानले.
वकिलांच्या हितासाठी कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बार कौन्सिलच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे, तळोजा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स ट्रेनिंग अँड अकॅडमी रिसर्च सेंटरच्या माध्यमातून तरुण वकिलांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, अॅडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी पाठपुरावा करणे, मेडिक्लेम व डेथ क्लेमसाठी विशेष निधी उभारणे आणि नवोदित वकिलांसाठी स्टायपेंड योजना राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
“कोणताही राजकीय अजेंडा न ठेवता सर्वांना सोबत घेऊन काम केल्यामुळे हे यश मिळाले,” असे सांगत त्यांनी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.
सत्कार समारंभात जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. परिमल नाईक यांनी अॅड. देसाई यांच्या कार्याचा गौरव करत भविष्यात त्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियामध्ये नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमास अॅड. अमोल सामंत, विवेक मांडकूलकर, गौरव पडते, अमित हरमळकर, यतिश खानोलकर, राजीव बिले, आनंद गवंडे, अविनाश परब, रुपेश परुळेकर, श्याम सावंत, संदीप निंबाळकर, अजित भणगे, रुपेश देसाई, सुहास सावंत यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने वकील बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा