You are currently viewing चिंदरमध्ये १६ विकासकामे पूर्ण; दीपक सुर्वेंनी जनतेची दिशाभूल थांबवावी – संतोष कोदे
Oplus_16908288

चिंदरमध्ये १६ विकासकामे पूर्ण; दीपक सुर्वेंनी जनतेची दिशाभूल थांबवावी – संतोष कोदे

दत्ता सामंत व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात; १६ कामांची यादी जाहीर करत सुर्वेंना राजीनाम्याचे खुले आव्हान

मालवण :

चिंदर गावातील वाडी-वस्तीवरील जनतेची मागणी आणि गरज लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी १४ नव्हे, तर प्रगतीपथावर असलेल्या दोन कामांसह तब्बल १६ विकासकामे एकाच वेळी पूर्ण केली आहेत. गावात विकासकामांचा झंझावात निर्माण झाल्यामुळे येथील जनतेसाठी काहीच न करणाऱ्या पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच ते अक्कलचे तारे तोडत जनतेची दिशाभूल करत आहेत, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना चिंदर विभागप्रमुख संतोष कोदे यांनी केला.

दीपक सुर्वे यांनी, “जर दत्ता सामंत यांनी चिंदर गावात स्वखर्चातून १४ विकासकामे केली असतील, तर मी माझ्या पंचायत समिती गटनेते पदाचा राजीनामा देईन, अन्यथा सामंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा,” असे आव्हान प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले होते. या आव्हानाला चोख उत्तर देत संतोष कोदे यांनी गावात झालेल्या १६ विकासकामांची थेट यादीच जाहीर केली.

संतोष कोदे यांनी दीपक सुर्वेंवर निशाणा साधताना म्हटले की, “चिंदर गावातील अनेक वाड्यांमध्ये ग्रामस्थांच्या घराकडे जाण्यासाठी धड रस्ता नाही, तिकडे दीपक सुर्वे यांनी कधी लक्ष दिले नाही. मात्र, स्वतःच्या घराकडे जाण्यासाठी त्यांनी शासनाचा १५ लाखांचा निधी खर्च केला. स्वतःच्या घरासाठी निधी लाटणाऱ्या सुर्वेंना गावातील जनतेच्या विकासाशी काहीही देणेघेणे नाही. या १५ लाखांच्या निधीचा हिशोब सुर्वे यांनी जनतेला द्यावाच लागेल, अन्यथा त्यांनी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा.”

“आम्ही आमदार निलेश राणे आणि दत्ता सामंत यांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या १६ कामांची यादी जाहीर केली आहे. सुर्वेंनी जनतेसोबत या कामांच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी. त्या-त्या वाडीतील जनताच सांगेल की ही कामे कोणी केली आहेत. वास्तव डोळ्यासमोर असताना आपले अपयश लपवण्यासाठी सुर्वे थयथयाट करत आहेत. त्यामुळे त्यांनी आता केवळ गटनेते पदाचाच नव्हे, तर पंचायत समिती सदस्य पदाचाही राजीनामा द्यावा,” असे खुले आव्हान कोदे यांनी दिले.

संतोष कोदे यांनी चिंदर गावातील विकासकामांची यादी प्रसिद्ध माध्यमांसमोर सादर केली. त्यामध्ये चिंदर तेरई रस्ता डांबरीकरण करणे, चिंदर लब्देवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे, चिंदर कावले घर ते लब्देवाडी रस्ता तयार करणे, चिंदर लाटमवाडी रस्ता डांबरीकरण करणे, चिंदर सडेवाडी-गोसावीवाडी येथील गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, चिंदर सडेवाडी ते देवकोंड वाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे, चिंदर सडेवाडी स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण करणे, चिंदर सडेवाडी येथे स्मशानशेड बांधणे, चिंदर मुळे घर रस्ता मजबुतीकरण करणे, चिंदर गावडेपुरुष रस्ता डांबरीकरण करणे, चिंदर बागवाडी रस्ता मजबुतीकरण करणे, चिंदर कुंभारवाडी स्मशानभूमी रस्ता डांबरीकरण करणे, चिंदर कुंभारवाडी येथे गणेश घाट बांधणे व सुशोभीकरण करणे, चिंदर सडेवाडी-गोसावीवाडी-घागरे घर रस्ता तयार करणे, चिंदर मसुरकरवाडी येथे महापुरुष पार बांधणे तसेच चिंदर पालकरवाडी-पाटणवाडी येथील एस.टी. वाहतुकीस अडथळा ठरणारा विद्युत पोल तात्काळ बदलून देणे या कामांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

“दीपक सुर्वे, तुमचे आणि तुमच्या सहकाऱ्यांचे अनेक कारनामे आहेत, जे आम्ही योग्य वेळी जनतेसमोर आणू. आम्हाला गावात घाणेरडे राजकारण करायचे नाही. आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला फक्त गावाचा विकास आणि जनतेची प्रामाणिक सेवा करायची आहे. चिंदर गावाच्या गतिमान विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे संतोष कोदे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा