You are currently viewing कणकवली बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम

कणकवली बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम

कणकवली बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम

बसस्थानकाच्या २०० मीटर परिघात प्रवासी वाहतूक केल्यास कारवाईचा इशारा; चालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

कणकवली

परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी, मुंबई यांच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग विभागात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत कणकवली बसस्थानकाच्या २०० मीटर परिघातील खाजगी प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी संबंधित चालकांना सूचना देण्यात आल्या.
कणकवली बसस्थानक परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहासीटर, रिक्षा व ट्रॅव्हलर चालकांना बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली एकत्रित करण्यात आले. यावेळी त्यांना बसस्थानकाच्या २०० मीटर परिघाबाहेरूनच प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या परिघात प्रवासी वाहतूक करताना आढळून आल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला.
या मोहिमेदरम्यान सिंधुदुर्ग विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी महेंद्र शिवाजीराव टापरे, कणकवली आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, राखण व पहारा निरीक्षक सतीश तिवडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीनिवास कदम, वाहतूक नियंत्रक श्री. तांबे, श्री. चव्हाण, श्री. पावसकर, सुरक्षा रक्षक अर्जुन कांबळे तसेच कणकवली आगारातील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.
महामंडळाचे उत्पन्न वाढविणे, अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आणि प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती सुरक्षा व दक्षता अधिकारी महेंद्र शिवाजीराव टापरे यांनी दिली. तसेच सर्व खाजगी वाहतूक चालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा