You are currently viewing तिवरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कविता संग्रहाचे ४ मे रोजी प्रकाशन…

तिवरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कविता संग्रहाचे ४ मे रोजी प्रकाशन…

कणकवली

गुणी शिक्षक आणि त्यांना साथ देणारे समंजस पालक एकत्र आल्यास क्रमिक पुस्तकापलिकडील शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत जाते आणि त्यांच्या उपजत कलागुणांना वावही मिळतो. असाच एक उपक्रम तालुक्यातील तिवरे खालचीवाडी प्राथमिक शाळेत घेण्यात आला असून शिक्षकांच्या प्रयत्नातून लिहित्या झालेल्या पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा आता कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. बुधवार ४ एप्रिल रोजी सायं. ५:०० वा. तिवरे शाळेत प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या आणि जिल्हा प्रा.शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात कवी अजय कांडर यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, जिल्हा उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, कैलास राऊत केंद्रप्रमुख जुहिली सावंत आदींना निमंत्रित करण्यात आहे तर यावेळी तिवरे सरपंच प्रमिला गुरव, उपसरपंच रवींद्र आंबेलकर, कवी संतोष महाडेश्वर, कवी सुरेश कुलकर्णी, कवी संतोष तावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास आंबेलकर आदी मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

तिवरे खालचीवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कविता लेखन करत आहेत असं लक्षात आल्यावर या शाळेचे मुख्याध्यापक विजय शिरसाट, त्यांचे सहकारी संदीप कदम, हेमंत राणे, विजय मेस्त्री आदी शिक्षकांनी प्रसंगी मान्यवर कवींना निमंत्रित करून मुलांवर कवितेचे संस्कार घडविले.त्यातून मुलानी सुमारे पन्नास-साठ कवितांचे लेखन केले. यातून उत्तम 40 कविता निवडून तिवरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा हा देखणा काव्यसंग्रह प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला.पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या अशा चाळीस कवितांचा संग्रह जिल्हा परिषदेच्या एखाद्या शाळेने प्रसिद्ध करणे ही प्राथमिक शाळेच्या शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची घटना आहे. यावरूनच या प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रहाचे ‘मोल किती अनमोल’ आहे हे लक्षात येईल.या संग्रहात कविता प्रसिद्ध होणाऱ्या कवींपैकी एखादा कवी जरी भविष्यात मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात कवी म्हणून स्थिर झाला तर फक्त तिवरे गावचाच नाही तर संपूर्ण तळकोकणचा तो भविष्यकालीन महत्त्वाचा साहित्यिक दस्तऐवज ठरणार आहे. या संग्रहाला अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ बाललेखिका डॉ संगीता बर्वे (पुणे) यांची प्रस्तावना लाभली असून कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा