You are currently viewing २० जूनपूर्वी ‘सीबीएसई’चा दहावीचा निकाल

२० जूनपूर्वी ‘सीबीएसई’चा दहावीचा निकाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २० जूनपूर्वी जाहीर करण्यात येणार असून वर्षभरातील चाचणी, सहामाही परीक्षांच्या आधारे शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून मंडळाकडे निकाल द्यायचा आहे.

‘सीबीएसई’ने दहावीची परीक्षा रद्द केली. त्याचवेळी विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर करण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार याबाबत आता मंडळाने मूल्यमापन आराखडा जाहीर केला असून यंदाही १०० पैकीच गुण ग्राह््य धरण्यात येणार आहेत. शाळांनी मे महिन्यात मूल्यमापनाचे काम पूर्ण करून ११ जूनपर्यंत मंडळाकडे निकाल पाठवायचा आहे. त्यानंतर २० जूनपूर्वी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. त्यात अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण मिळवून अंतिम १०० गुणांपैकी निकाल जाहीर करण्यात येतो. यंदाही शाळांनी अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण गृहित धरून परीक्षण केले आहेत. प्रचलित निकषांनुसार केलेल्या या परीक्षणाचे २० गुण ग्राह््य धरण्यात येणार आहेत. राहिलेल्या ८० गुणांसाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेली कामगिरी लक्षात घेऊन शाळांनी मूल्यमापन करायचे आहे.

*शाळास्तरावर समिती…*

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी शाळांनी समिती स्थापन करायची आहे. मुख्याध्यापक आणि गणित, समाजशास्त्र, विज्ञान आणि दोन भाषा विषयाच्या शाळेतील एका शिक्षकाचा या समितीत समावेश असेल. त्याशिवाय दोन शिक्षक हे बाहेरील शाळेचे असावेत अशी सूचनाही मंडळाने दिली आहे. बाहेरील शाळांतील शिक्षकांना २५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. तर शाळेतील शिक्षकांना या कामासाठी १५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. शाळांनी ५ मेपर्यंत ही समिती स्थापन करायची आहे.

८० गुणांचे विभाजन

चाचणी परीक्षा १० गुण

सहामाही – ३० गुण

सराव परीक्षा ४० गुण

*बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच*

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे मंडळाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक आणि तपशील १ जूनच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आला असून तो सीबीएसईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − twelve =