You are currently viewing रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे उमेदवार..?

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे उमेदवार..?

*नाम.दीपक केसरकर स्टार प्रचारक..*

 

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तरी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले नाहीत कारण “अब की बार चारसौ पार” चा नारा देऊन निवडणुकीत उतरणाऱ्या भाजपाला मित्रपक्षांवर म्हणावा तेवढा भरवसा नाही म्हणा किंवा शक्य तेवढ्या जागांवर आपलेच उमेदवार उभे करण्याची महत्त्वाकांक्षा अन् छोट्या पक्षांना संपविण्याचा उद्देश मनात बाळगून एकहाती सत्ता मिळविण्याचे स्वप्न पडले. त्यामुळेच कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना देखील शिवसेनेला डावलून भाजपा आपला उमेदवार म्हणून नाम.नारायण राणे यांना उमेदवारी देऊन इतर इच्छुकांना शांत करण्याचे प्रयत्न करत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून नाम.उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत हे धनुष्यबाण निशाणीवर लोकसभा लढविण्यासाठी पूर्ण तयारी करून मैदानात उतरणार होते परंतु भाजपने नारायण राणेंचे नाव पुढे करून शिवसेनेला चेकमेट दिला आहे. एवढेच नव्हे तर कुडाळ येथे महायुतीचा मेळावा घेऊन जो उमेदवार वरिष्ठ पातळीवरून देणार त्यांना निवडून आणण्याची रणनीती देखील बनवली आहे. या मेळाव्यात भाजपा, शिवसेना(शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आदी सर्व पक्षांचे मंत्री, नेते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कुडाळ येथील मेळाव्यात अप्रत्यक्षपणे नाम.नारायण राणेंचे नाव लोकसभा उमेदवार म्हणून पुढे आले आणि नारायण राणेंनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुक्यातील भाजपा कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या भेटीगाठी नारायण राणे हेच लोकसभेचे उमेदवार असतील अशीच अटकळ आहे. *परंतु….* इथे किंतु परंतु उपस्थित होणे साहजिकच आहे, कारण शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाने आपला उमेदवार लादणे म्हणजे संकटाला आमंत्रणच..!
गेल्या एका दशकापेक्षा जास्त काळ आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे विरुद्ध दीपक केसरकर यांचे खुलेआम शाब्दिक युद्ध पाहिले आहे. नारायण राणे यांच्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत केसरकरांनी राणेंना केवळ जिल्ह्यात पराभवाला सामोरे जायला लावले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नारायण राणेंची प्रतिमा मलिन करत मुंबईत देखील पराभव चाखण्यासाठी कारणीभूत ठरले. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणेंची जिल्ह्यातील तीन दशकांची अबाधित सत्ता केसरकरांनी आपल्या थंड डोक्याने उलथवून लावली, राणेंच्या चिरंजीवांना दोन वेळा लोकसभेत पराभूत करण्यास कारणीभूत ठरले. कित्येकदा राणेंनी केसरकरांनी खुलेआम ललकारले, धमक्या सुद्धा दिल्या परंतु प्रत्येकवेळी केसरकर वरचढ ठरले. केसरकरांनी एकवेळ राणेंची मदत घेत नगरपालिकेत चंचुप्रवेश केला होता तेच केसरकर नारायण राणेंवर पुढे भारी पडले आणि सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत तर एकवेळ १७/० असा राणेंच्या पक्षाचा पराभव करत किंगमेकर बनले. केसरकरांनी सावंतवाडी पोलीस परेड मैदानावर “संभवामी युगे युगे” हा महानाट्य प्रयोग घेत राणेंना डिवचले होते. त्यामुळे राणे केसरकर यांच्यामधून नंतर विस्तव देखील जात नव्हता…मग अचानक नाम.दीपक केसरकर राणेंचे स्टार प्रचारक कसे काय बनले..? राणे आणि केसरकर यांच्यात दिलजमाई कशी झाली..? खरोखरच राणे केसरकर वाद मिटला की केवळ सत्तेची फळे चाखण्यासाठी तूर्तास बाजूला सारला..?
कुडाळ महालक्ष्मी हॉल मध्ये आयोजित मेळाव्यातून दीपक केसरकर स्वतःच्या नेहमीच्या स्टाईलने “मुंबईला निघायचे आहे, विमान पकडायचे आहे” असे म्हणून निघाले. त्यामुळे लोकसभा उमेदवारीच्या मेळाव्यात त्यांना जास्त रस नसल्याचे दिसून आले. मिडियासमोर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देखील दिली नाही. केवळ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वरिष्ठ जो उमेदवार देतील त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आणि चारशे पेक्षा जास्त खासदार निवडून आणत मोदींचे हात बळकट करायचे अशी प्रतिक्रिया दिली. एकंदरीत या मेळाव्यातून लोकसभेचे चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट झाले आणि विनायक राऊत विरुध्द नारायण राणे अशी लढत होणार हे निश्चित झाले.
सावंतवाडीतील प्रत्येक पत्रकार परिषदेत नाम.दीपक केसरकर किरण सामंत हेच आमचे लोकसभेचे उमेदवार अशी माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर किरण सामंत यांच्या प्रचाराचे बिगुल देखील वाजवले होते. फेब्रुवारी महिन्यातील महोत्सव दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात किरण सामंत यांचे होल्डींग लावून भावी खासदार म्हणून लाँचिंग देखील केले होते. उदय सामंत यांनी देखील कुडाळ येथील मेळाव्यानंतर अजून मतदारसंघातील उमेदवार निश्चित झालेला नसून किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच गेले अनेक महिने पॅड बांधून लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेले उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना पर्यायाने शिवसेनेला डावलून भाजपने सीट आपल्याकडे घेणे म्हणजे मुळात शिवसेना शिंदे गटाला नाराज करणे होय..! त्यामुळे रत्नागिरीत वर्चस्व असलेले नाम.उदय सामंत आणि किरण सामंत हे भाजपा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मनापासून काम करतील का..? हा कळीचा मुद्दा आहे.
माजी मंत्री सुरेश प्रभुंपासून हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभा राहिला आहे. धनुष्यबाण निशाणी मतदारांच्या हृदयावर कोरली आहे. त्यामुळे कमळ निशाणी असो वा मशाल मतदारांपर्यंत पोचविणे सोपे जाणार नाही. दुसरी एक बाजू म्हणजे दोडामार्ग पासून सुरू झालेला हा मतदारसंघ मंडणगड पर्यंत विखुरला आहे. हे अंतर जवळपास साडे तीनशे ते चारशे किलोमिटर आहे. एवढे अंतर किरून प्रचार करणे ही साधी गोष्ट नव्हे. प्रकृती ठणठणीत नसल्याने राणेंची दमछाक होईल. नाम.दीपक केसरकर असो की नाम.उदय सामंत जरी वरवर मित्रपक्षांशी युती धर्म निभावत असले तरी आपला पक्ष मोठा मानत भाजपला मदत केलीच नाही तर भाजपाला विनायक राऊत नावाचे वादळ थोपविणे कठीण जाणार. कारण भक्तिरसात मग्न होणाऱ्या विनायक राऊत यांचा मतदारसंघात लोकसंपर्क दांडगा आहे, शांत संयमी म्हणूनही त्यांची प्रतिमा आहे. त्याच बरोबर शिवसेनेला डावलल्या नंतर लोकप्रतिनिधी, नेते, मंत्री सत्तेसाठी मने जुळवून एकत्र येतीलही..परंतु शिवसेनेचे मतदार भाजपा कडे न जाता आपल्या मूळ शिवसेना(उबाठा) पक्षाकडे का जाणार नाहीत..? आपल्या पक्षाचे खच्चीकरण करून पक्ष नामशेष करण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या भाजपाला शिवसेनेचे शिवसैनिक, मतदार अद्दल घडवणार नाहीत असे कोणी छातीठोकपणे शकतो का?
दुसरीकडे भाजपातील एक गट राणेंचे वर्चस्व कमी करण्यासाठी कार्यरत असताना कोकणात भाजपा एकदिलाने, एकसंधपणे लढू शकेल का..?
जिल्ह्यात जरी अनेक आघाड्यांवर राणेंचे वर्चस्व असले तरी परकियच नव्हे तर स्वकीय विरोधक देखील राणेंचेच जास्त आहेत हे सत्य नाकारून चालणार नाही. अशा अनेक कारणांनी भाजपा पिछाडीवर राहणार तर नाही ना..? अशी शंका येत आहे.
नारायण राणे यांनी गुरुवारी सायंकाळी सावंतवाडीत पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या संपर्क कार्यालयात सावंतवाडी शहरातील पत्रकारांशी राणे यांनी गप्पा मारल्या, राजकारणातील आपले अनुभव सांगताना त्यांनी आपण यशस्वी उद्योजक असल्याचे सांगीतले. 250 कोटी खर्चून हॉस्पिटल, मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केल्याचे सांगितले. जिल्ह्यात विकास करताना वेळोवेळी विरोध झाला. त्यामुळे अनेक प्रकल्प रेंगाळल्याचे देखील सांगितले. आपल्याला राजकरणात मोठी पद मिळाली त्याचा जनतेसाठी उपयोग केल्याचेही ते म्हणाले. प्रहार हे वृत्तपत्र देखील आपण चालवतो. मात्र जिल्ह्यात आपल्याला विधायक पत्रकारिता दिसलीच नाही अशी खंत व्यक्त केली. दीपक केसरकर व राणे वाद शमला या प्रश्नावर बोलताना राणे म्हणाले, *”हा दीपक केसरकर यांच्या मनाचा मोठेपणा आहे”*… *त्यानंतर लगेच मिश्कीलपणे म्हणाले “माझे ग्रह बदलले असतील”* त्यामुळे राणे केसरकर वाद हा भूतकाळ झाला आणि पुढे उज्ज्वल भविष्यकाळ येणार अशी आशा वाटू लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =