चौकुळच्या शेवटच्या घरात ‘मन की बात’; गौरव मुळीकांचा अनोखा उपक्रम
दुर्गम भागातील ग्रामस्थांशी साधला थेट संवाद; स्थानिक समस्या जाणून घेत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा प्रयत्न
सावंतवाडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे संयोजक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी एक वेगळा आणि कौतुकास्पद उपक्रम राबविला. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांशी थेट संपर्क साधण्याच्या उद्देशाने त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील सर्वात शेवटच्या घरात बसून स्थानिक ग्रामस्थांसोबत ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला.
या उपक्रमाद्वारे गौरव मुळीक यांनी केवळ कार्यक्रमाचे श्रवणच केले नाही, तर दुर्गम वाडी-वस्तीवरील नागरिकांच्या दैनंदिन समस्या, अडचणी आणि गरजाही जाणून घेतल्या. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी असलेली त्यांची बांधिलकी यावेळी अधोरेखित झाली.
पक्षाचे विचार आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत आहे. चौकुळ परिसरातील ग्रामस्थांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी स्थानिक नागरिकांशी विकासकामे, मूलभूत सुविधा आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला. त्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय संपर्क थेट दुर्गम भागातील शेवटच्या घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे नागरिकांनी सांगितले.
