You are currently viewing जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून जगा; एकजूट हीच काळाची गरज – डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून जगा; एकजूट हीच काळाची गरज – डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून जगा; एकजूट हीच काळाची गरज – डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

मळगाव दशक्रोशीतील सकल हिंदू संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; धर्मजागृती, संस्कार आणि हिंदू एकतेचा संदेश

सावंतवाडी, प्रतिनिधी :

अमुक एका जातीची ओळख जपण्यात अडकून न पडता केवळ हिंदू म्हणून जगणे हीच आजच्या काळाची गरज आहे. जोपर्यंत हिंदू समाज एकत्र आहे, तोपर्यंतच तो सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून जगावे, असे ठाम प्रतिपादन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी केले.
मळगाव दशक्रोशी येथे हिंदू बांधवांमध्ये एकजूट निर्माण व्हावी, धर्मजागृती व्हावी आणि भावी पिढीपर्यंत संस्कार पोहोचावेत या उद्देशाने हिंदू संमेलन समन्वय समितीच्या वतीने शालू मंगल कार्यालयात आयोजित सकल हिंदू संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या संमेलनाला परिसरातील हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, शिवप्रतिमा व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. लक्ष्मण कडव, हिंदू संमेलन समन्वय समितीचे संयोजक ह.भ.प. शेखर पाडगावकर, सहसंयोजिका रंजना तेली, महेश पंतवालावलकर, हेमंत खानोलकर, भगवान रेडकर, मनीषा नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
धर्मसंरक्षणाची सुरुवात गावापासूनच व्हावी
मार्गदर्शन करताना डॉ. ठाकरे यांनी धर्मसंरक्षणाची सुरुवात आपल्या गावापासूनच झाली पाहिजे, असे सांगितले. समाजातील वाढत्या अपप्रवृत्तींपासून मुलींचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक कुटुंबाची असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचे महत्त्व विविध उदाहरणांतून स्पष्ट करत त्यांनी उपस्थितांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.
यावेळी त्यांनी ‘नागरिक मी या देशाचा’ या कवितेचे वाचन करत नागरिकांच्या अपेक्षा आणि कृतीतील विसंगतीवर भाष्य केले. तसेच उंदराच्या एका रूपककथेद्वारे “एकत्र राहिलो तरच सुरक्षित राहू” हा संदेश दिला.
प्रत्येक घरात भगवद्गीता असावी : लक्ष्मण कडव
प्रास्ताविकात संयोजक शेखर पाडगावकर यांनी जात-पात विसरून हिंदू म्हणून जगण्याचे आवाहन केले. प्रमुख अतिथी ह.भ.प. लक्ष्मण कडव यांनी भगवद्गीतेचे जीवनातील महत्त्व विशद करत प्रत्येक हिंदूच्या घरात भगवद्गीता असावी आणि तिचे नियमित वाचन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मेजवानी
संमेलनाची सुरुवात नावनोंदणी व अल्पोपहाराने झाली. त्यानंतर गायक हेमंत गोडकर व मुग्धा पंतवालावलकर यांचे सुगम संगीत, अंकुश आजगावकर यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा तसेच हर्षिता राऊळ व खुशी लातये यांची मर्दानी लाठी-काठीची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
याशिवाय दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून इतिहासप्रेमी ज्ञानेश्वर राणे यांनी शिवकालीन शस्त्रे व पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरवले होते. उपस्थितांनी या प्रदर्शनाचा उत्स्फूर्त लाभ घेतला.
कार्यक्रमातील सर्व कलाकार व सहकाऱ्यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा नाटेकर-राऊळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन रंजना तेली यांनी केले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी हिंदू संमेलन समन्वय समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा