गुळदुवे-शेटकरवाडी रस्ता खचल्याने वाहतुकीला धोका; आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास रास्तारोकोचा इशारा
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांमध्ये संताप; पिण्याच्या पाण्याच्या तळी व बागायतींनाही धोका
सावंतवाडी
मळेवाड-आरोंदा मुख्य रस्त्यावरील गुळदुवे शेटकरवाडी येथील रस्ता मागील अनेक महिन्यांपासून खचलेल्या अवस्थेत असून अद्यापही त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा मार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या बाजूचा भराव कोसळल्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या तळी तसेच बागायतींनाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मागील वर्षी जून २०२५ मध्ये शेटकरवाडी परिसरातील मुख्य रस्त्याचा काही भाग बाजूने खचला होता. याबाबत संबंधित विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने धोकादायक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेट्स उभारून दिवाळीनंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, २०२६ उजाडूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
दरम्यान, रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून खचण्याचे प्रमाण वाढत आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूंना वळण असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन बांधकाम विभागाकडे सादर करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
संभाव्य दुर्घटना किंवा मोठे नुकसान होण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा एखादा अपघात झाल्यास त्यास बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा इशारा गुळदुवेचे सरपंच शैलेश जोशी यांनी दिला आहे. तसेच येत्या आठ दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
