You are currently viewing महोदय पर्वणी निमित्त मालवण समुद्र किनारा भाविकांनी फुलला…

महोदय पर्वणी निमित्त मालवण समुद्र किनारा भाविकांनी फुलला…

महोदय पर्वणी निमित्त मालवण समुद्र किनारा भाविकांनी फुलला…

अनेक गावच्या देवदेवतांनी रयतेसह लुटला समुद्रस्नानाचा आनंद..

मालवण

तब्बल पाच वर्षांनी आलेल्या महोदय पर्वणीच्यानिमित्ताने मालवणात समुद्र स्नानासाठी दाखल झालेल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून देवस्वाऱ्यानी आपल्या भविकांसह आज सकाळी दहा वाजल्यापासून मालवण दांडी येथील मोरयाचा धोंडा तसेच कोळंब येथिल समुद्रात समुद्रस्नान करून पर्वणीचा योग साधला महोदय पर्वणीच्या निमित्ताने मालवण दांडी किनारा भाविकांनी फुलून गेला होता

महोदय पर्वणीनिमित्त मालवणात कालपासून दाखल झालेल्या देवतांचे मालवणवासीयांनी जल्लोषात स्वागत व आदरातिथ्य केले. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठीकठिकाणची ग्रामदेवता, देव देवता पालखीत विराजमान होऊन आपल्या रयतेसह पायी चालत मालवण शहरात दाखल झाले होते. या देवांच्या व भाविकांच्या वस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सोय उपलब्ध करून दिली होती.

दांडी – वायरी येथील मोरयाचा धोंडा या तीर्थस्थानावर म्हणजेच मोरेश्वर किनाऱ्यावर आज दर्श – मौनी अमवास्या व महोदय-पर्वणी निमित्त जिल्हाभरातील भक्तांनी आपल्या ग्रामदेवतेसह समुद्र स्नानाचा लाभ घेतला. सकाळी ९ वाजल्यापासून हा देवतांचा लवाजमा ढोल, ताशा, पालखी, तरंगा,घेवून मालवण दांडी मोरेश्वर तीर्थक्षेत्री समुद्र स्नाना साठी निघाला. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, नांदोस चा श्री देव गिरोबा, निरूखेचा श्री देव रवळनाथ, ओरोसचा श्री देव रवळनाथ, तळगावचा श्री देव रामेश्वर, अणाव चा स्वयंभू श्री देव रामेश्वर, तिरवडे ची श्री माऊली देवी, कसालची श्री देवी पावणाई व रवळनाथ, साळेलचा श्री देव गिरोबा, पडवेची श्री देवी पावणाई आदी व इतर विविध ठिकाणच्या देवता मोरेश्वर किनारी दाखल होऊन पूजा अर्चा नंतर समुद्र स्नान केले. यावेळी देवतांसोबत आलेल्या हजारो भाविकांनी देखील समुद्र स्नान केले. दुपारी उशिरा पर्यंत भाविक समुद्र स्नानाचा आनंद घेताना दिसून येत होते.

मोरेश्वर किनाऱ्यावर मोरेश्वर मित्रमंडळ, अशोक तोडणकर मित्रमंडळ, निलेश राणे व दत्ता सामंत यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच स्थानिकांकडून महिलांसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था केली होती. तसेच स्थानिक मच्छिमार व वॉटरस्पोर्ट्स व्यवसायिकांनी समुद्रस्नाना दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी समुद्रात किनाऱ्यालागत नौका व जीवरक्षक तैनात ठेवले होते. तर पोलीस प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रणासाठी होमगार्ड्स तैनात ठेवले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा